* ५६.७६ द्द्र / ” चा ११ महिन्यांचा नीचांक स्तर
* सलग पाचव्या सत्रात घसरण सुरूच
सलग पाचव्या सत्रात अमेरिकी चलनाच्या तुलनेत घसरगुंडी कायम ठेवत, रुपया सोमवारच्या चलन बाजारातील व्यवहारात आणखी २६ पैशांनी गडगडत डॉलरमागे ५६.७६ अशा ११ महिन्यांपूर्वीच्या नीचांक पातळीवर गेला. आपल्या भांडवली बाजारातून समभाग विक्री करून विदेशी गुंतवणूकदारांचे पलायनामुळे वाढलेल्या डॉलरच्या मागणीतून रुपयाच्या कमजोरीला हातभार लावला.
शुक्रवारी प्रमुख शेअर निर्देशांक – सेन्सेक्समधील ४५० अंशांच्या घसरणीत सोमवारी आणखी १५० अंशांची भर पडली आहे. भांडवली बाजारातील या पडझडीचा सर्वाधिक जाच रुपयाला होताना दिसत आहे. आज उपलब्ध झालेल्या ढोबळ माहितीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून ८६.६६ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. गेल्या पाच दिवसात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत १२० पैशांनी अवमूल्यन झाले असून, प्रति डॉलर ५७.३२ या सार्वकालिक नीचांकापासून आता रुपया फार दूर राहिलेला नाही.
चलन बाजारात आज रुपयाने शुक्रवारच्या प्रति डॉलर ५६.५५ या पातळीवरच आंतरबँक व्यवहाराला सुरुवात केली. प्रारंभीच्या व्यवहारात रुपया अल्प काळासाठी काहीसा मजबूत होऊन ५६.४० वर गेला. पण बाजार बंद होताना रुपया/डॉलर विनिमय दरातील व्यस्तता वाढत गेली आणि शुक्रवारच्या तुलनेत २६ पैशांची तूट सोसत तो ५६.७६ या पातळीवर बंद झाला.
वस्तुत: जगातील सहा प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर काहीसा कमजोर झाला असताना, भारतीय चलनाला त्याचा लाभ झालेला दिसून येत नाही. देशांतर्गत विदेशी गुंतवणूकदार आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. गेल्या महिन्याभरात रुपयाची पडझड पाहता अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक ऱ्हास झालेले ते आशियाई चलन ठरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
शेअर बाजारातील पडझडीचा रुपयाला जाच!
सलग पाचव्या सत्रात अमेरिकी चलनाच्या तुलनेत घसरगुंडी कायम ठेवत, रुपया सोमवारच्या चलन बाजारातील व्यवहारात आणखी २६ पैशांनी गडगडत डॉलरमागे ५६.७६ अशा ११ महिन्यांपूर्वीच्या नीचांक पातळीवर गेला.
First published on: 04-06-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Down fall of share market effects on rupee