मुंबई : आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने १३ ते १५.७ टक्क्यांनी वाढ नोंदवलेली दिसेल, असे कयास आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच झालेल्या बैठकीत तिमाहीसाठी १६.२ टक्के विकासदराचे पूर्वानुमान कायम ठेवले आहे, त्यापेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज कमी आहेत.  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून पुढील आठवडय़ाच्या अखेरीस तिमाहीची आकडेवारी जाहीर केली जाणे अपेक्षित आहे.

स्टेट बँकेचे समूह मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी पहिल्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात ‘जीडीपी’वाढीचे प्रमाण १५.७ टक्क्यांच्या पुढे राहण्याची अपेक्षा मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या टिपणांतून व्यक्त केली आहे. आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमधून व्यक्त झालेला हा सर्वोच्च अंदाज असून, अंतिम आकडेवारी यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता अधिक आहे, असे घोष यांनी म्हटले आहे. त्या उलट पतमानांकन संस्था ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी जून तिमाहीत अर्थव्यवस्था जेमतेम १३ टक्क्यांनी वाढ साधण्याचा अंदाज वर्तविला आहे.

करोना साथीच्या पहिल्या लाटेमुळे जून २०२० मध्ये अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी आक्रसली होती. मात्र जून २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेच्या थैमानाने अनेकांना जीवम गमवावे लागले असतानाही, टाळेबंदीतील शिथिलतेने ‘जीडीपी’मध्ये २०.१ टक्क्यांपर्यंत वाढ साधली गेली होती. सरलेल्या एप्रिल-जून तिमाहीत अर्थव्यवस्था १६.२ टक्के दराने  वाढण्याचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या नेतृत्वाखालील पतधोरण निर्धारण समिती अर्थात एमपीसीने  ५ ऑगस्टला झालेल्या द्विमासिक आढाव्याच्या बैठकीत वर्तविला होता. मध्यवर्ती बँकेने याच बैठकीत संपूर्ण वर्षांसाठी ७.२ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे. 

गव्हाच्या उत्पादनावर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव, भू-राजकीय समस्या आणि त्या परिणामी मुख्यत: आयातीत वस्तूंच्या वाढलेल्या किमती यासह जून २०२१ तिमाहीत उच्च आधारभूत आकडय़ांच्या प्रभावाने यंदाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत १३ टक्क्यांचा विकासदर शक्य असेल, असे इक्राच्या नायर यांचे विश्लेषण आहे. त्यांच्या मते, तिमाहीतील सकल मूल्यवर्धन यातून १२.६ टक्क्यांवर येईल. ‘इक्रा’च्या टिपणानुसार, सेवा क्षेत्रामुळे १७ ते १९ टक्के वाढीचे योगदान येईल आणि त्यानंतर निर्मिती (औद्योगिक) क्षेत्रातून ९ ते ११ टक्के योगदान तिमाहीत मिळू शकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामांचे भोग आता सहा महिने लोटत आले तरी सुरूच असल्याचे नायर आवर्जून नमूद करतात, तर घोष यांच्या मते समष्टी जागतिक अर्थव्यवस्थेवरील युद्धाचे परिणाम बव्हंशी कमी झालेले दिसून येतात. एकंदरीत, नायर यांनी जून तिमाहीत अर्थव्यवस्थेतील वाढ ही रिझव्‍‌र्ह बँकेच्या एमपीसीने वर्तवलेल्या १६.२ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अनुमान वर्तविले आहे. मात्र दुसऱ्या तिमाहीत एमपीसीच्या ६.२ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष वाढ ही अधिक ६.५ टक्के ते ७ टक्के दराने होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.