महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांकडून शुल्क आकारणी करण्यास काही बॅंकांनी सुरुवात केली आहे. महिन्यातून पाचपेक्षा जास्तवेळा एटीएममध्ये व्यवहार करणाऱया ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यास रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबरपासून याप्रकारे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बॅंकेच्या निर्णयापाठोपाठ खासगी क्षेत्रातील अॅक्सिस आणि एचडीएफसी या दोन्ही बॅंकांनीही शुल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे. सध्या केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बेंगळुरू या सहा महानगरांमध्ये ही आकारणी करण्यात येणार असली, तरी पुढील काळात सर्वच ठिकाणी त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
बॅंकांच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या एटीएम वापरावर बंधने येणार आहेत. पाचपेक्षा जास्तवेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांना स्वतःच्या खिशातून बॅंकेला पैसे द्यावे लागणार आहेत. या निर्णयामुळे होणारा भुर्दंड वाचविण्यासाठी बॅंक ग्राहकांना काय करता येईल, यावर टाकलेला प्रकाशझोत…
कार्ड स्वाईपचा वापर…
प्रत्येकवेळी एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यापेक्षा ग्राहकांनी त्यांच्याकडील डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध खरेदी करावी. डेबिट कार्ड दुकानदाराकडे स्वाईप करून थेट रोख रकमेचा व्यवहार ग्राहक टाळू शकतात. त्याचबरोबर यामुळे सातत्याने एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची गरजही ग्राहकांना पडणार नाही.
नेटबॅंकिंगचा पर्याय
नेटबॅंकिंगचा जास्तीत जास्त वापर करूनही ग्राहक एटीएममध्ये न जाता आपली कामे करू शकतात. नेटबॅंकिंगच्या साह्याने ग्राहक विविध प्रकारची बिलं भरू शकतात. त्याचबरोबर दुसऱयाच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवू शकता. सध्या जवळपास सर्वच बॅंकांनी आपले मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मोबाईलमधील अॅपचा वापर करूनही ग्राहक अगदी काही क्षणात बॅंकेचे व्यवहार करू शकतात. या सुविधेचा वापर केल्यामुळे एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याची गरज जास्त पडणार नाही.
एटीएमचा वापर फक्त पैसे काढण्यासाठीच
एटीएमच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्यामुळे ग्राहकांनी केवळ पैसे काढण्यासाठीच एटीएमचा वापर करावा. मिनी स्टेटमेंट काढणे, खात्यातील शिल्लक पाहणे, मुदत ठेव करणे इत्यादी सुविधांसाठी एटीएमचा वापर न करता इतर पर्यायांचा विचार करावा. मोबाईल बॅंकिंगच्या साह्याने ग्राहक खात्यातील शिल्लक तपासू शकतात. आयव्हीआर सुविधेच्या साह्याने ग्राहक आपले पासवर्डही बदलू शकतात. या पर्यायांचा वापर करून ग्राहकांना एटीएमवरील अवलंबित्व कमी करता येईल.
आर्थिक शिस्त
प्रत्येक आठवड्यात तुम्हाला किती पैशांची गरज आहे, त्याचा अंदाज घ्या. तुम्हाला जेवढे पैसे लागणार आहेत. त्यापेक्षा थोडी जास्तच रक्कम एटीएममधून काढा. यामुळे सारखे सारखे एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर जेवढे पैसे काढले आहेत. त्यातूनच आठवड्याचा खर्च भागविण्याची शिस्त तुमच्यामध्ये निर्माण होईल.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2014 रोजी प्रकाशित
एटीएम वापराचे शुल्क टाळण्यासाठी हे आहेत उपाय…
महिन्यातून पाचपेक्षा जास्त वेळा एटीएमचा वापर केल्यास ग्राहकांकडून शुल्क आकारणी करण्यास काही बॅंकांनी सुरुवात केली आहे.

First published on: 02-12-2014 at 11:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effective tips to avoid atm usage charges