* सेन्सेक्स पुन्हा २७ हजारापल्याड ’ निफ्टीने ८२५० पातळी राखली
शुक्रवारी जाहीर होणाऱ्या ब्रिटनमधील सार्वमताच्या निकालापूर्वी भांडवली बाजारात गुरुवारी आश्चर्यकारक तेजी नोंदली गेली. गेल्या सलग दोन व्यवहारांतील घसरण मोडून काढताना सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल २३६.५७ अंशवाढीसह २७,००२.२२ वर पोहोचला, तर ६६.७५ वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२७०.४५ वर स्थिरावला.
गुरुवारी सकाळपासून ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मतदान सुरू झाले असताना, युरोपातील बाजारांतील प्रारंभिक तेजीच्या व्यवहारांनी ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेत मानले गेले. परिणामी सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकही उंचावले. चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत अनेक सत्रांच्या घसरणीनंतर भक्कम बनलेल्या रुपयाचेही बाजारावर सकारात्मक प्रतिबिंब उमटले.
२८ देशांच्या युरोपीय संघात ब्रिटनने राहावे की बाहेर पडावे याबाबत घेतल्या गेलेल्या मतदानाचे निकाल शुक्रवारी स्पष्ट होतील. तथापि बुधवारी घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीतून संमिश्र कौल पुढे आला होता. ताज्या कल बदलाच्या संकेतांमुळे युरोपात व्यवसाय असलेल्या भारतीय कंपन्यांच्या समभागांमध्येही मूल्य उसळी नोंदली गेली.
यामध्ये टाटा मोटर्स, फोर्ज मोटर्स, हिंदाल्को, इन्फोसिस या ब्रिटनमध्ये अधिक व्यवसाय क्षेत्र असलेल्या समभागांचा अग्रक्रम होता.
गुरुवारच्या २७ हजारांपुढील वाटचालीमुळे सेन्सेक्स आता ८ जूननंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सत्रात त्याने २७,०६०.९८ पर्यंत झेप घेतली. सेन्सेक्ससह निफ्टीनेही गुरुवारच्या व्यवहाराद्वारे गेल्या दोन दिवसांतील घसरण रोखली गेली. ‘ब्रिग्झट’ धक्क्य़ापासून सावरण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असून प्रसंगी योग्य उपाययोजना केले जाण्याबाबत रिझव्र्ह बँक तसेच सेबी यांनी बुधवारी आश्वस्त केले होते.
सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभाग तेजीच्या यादीत राहिले. यात डॉ. रेड्डीज, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, सन फार्मा, ल्युपिन, महिंद्र अँड महिंद्र, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग २.१८ टक्क्य़ांपर्यंत वाढले. एकूण निर्देशांक तेजीतही एनटीपीसी, सिप्ला, टीसीएस, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्पसारख्या समभागांना २.१० टक्क्य़ांपर्यंत घसरणीला सामोरे जावे लागले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक सर्वाधिक, १.६१ टक्क्य़ासह वाढला, तर पाठोपाठ वाहन, आरोग्य निगा, स्थावर मालमत्ता निर्देशांकांनाही प्रतिसाद मिळाला. मुंबई शेअर बाजारातील मिड (+०.२७%) व स्मॉल कॅप (-०.०४%) निर्देशांकांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली.
युरोप, आशिया बाजारातही तेजी
ल्ल ‘ब्रेग्झिट’ घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर युरोपातील प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी वाढ नोंदली गेली. युरोपीय संघात राहायचे की नाही याबाबतच्या निकालापूर्वीच्या भांडवली बाजारातील व्यवहारादरम्यान ब्रिटनसह जर्मनी, फ्रान्स देशातील निर्देशांक वाढ नोंदवीत होते. याचबरोबर आशियातील भांडवली बाजारातही तेजी राहिली.
युरोपातील बाजारांची दमदार सुरुवात
एफटीएसई १०० ६,३२६.६२ +१.०३%
कॅक ४० ४,४५४.४५ +१.६७%
डॅक्स १०,२१७.६२ +१.४३%
(गुरुवार सायंकाळपर्यंत)
आशिया निर्देशांकांची सकारात्मक उसळी
निक्केई २२५ १६,२३८.३५ +१.०६%
स्ट्रेट टाइम्स २,७९३.८५ +०.२८%
हँग सेंग २०,८६८.३४ +०.३५%
(गुरुवार बंदअखेर)
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘ब्रेग्झिट’पूर्वी बाजारात आश्चर्यकारक तेजी
सेन्सेक्स पुन्हा २७ हजारापल्याड ’ निफ्टीने ८२५० पातळी राखली
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 24-06-2016 at 07:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Europe lifts sensex 236pts to 27002 ahead of brexit vote outcome