भांडवली बाजारावर सोमवारी सप्ताहारंभी देशविदेशातील अर्थचिंतांचे स्पष्ट सावट दिसून आले; परिणाम नफावसुलीसाठी झालेल्या समभागांच्या विक्रीने प्रमुख निर्देशांक-सेन्सेक्सने ३४७.५० अंश गमावले. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसातील या घसरणीने सेन्सेक्सने तीन आठवडय़ांपूर्वीच्या पातळीवर पुन्हा फेर धरला. जगभरात सर्वत्रच भांडवल बाजारातील नरमाईचे पडसाद स्थानिक बाजारावर जाणवले.
सोन्याची आयात वाढल्यामुळे एप्रिल ते जून २०१३ या तिमाहीतील चालू खात्यातील तुटीचा सायंकाळी उशिराने जाहीर होणारा आकडा प्रतिकूलच असेल आणि परिणामी रिझव्‍‌र्ह बँकेकडून ऑक्टोबरच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात आणखी वाढ केली जाईल, अशा चिंतांचे बाजारावर सावट दिसून आले. अमेरिकेत उद्भवलेला अर्थसंकल्पीय पेचप्रसंग, विश्वासदर्शक ठरावाची टांगती तलवार असलेले इटलीचे पंतप्रधान एन्रिको लेट्टा यांच्यामुळे तेथे निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता यामुळे नरमलेल्या आशियाई बाजारांनी स्थानिक शेअर बाजाराचा मूड प्रभावित केला.
आशियाई बाजारांचा कल पाहता, सेन्सेक्सने घसरणीसह सोमवारी सकाळी प्रारंभ केला. सरलेल्या शुक्रवारी १६६.५८ अंश घसरणीवर स्थिरावलेल्या सेन्सेक्समध्ये दिवस सरत गेला तशी घसरण रुंदावतच गेली. दिवसअखेर तो ६ सप्टेंबरच्या १९२७०.०६ पातळीच्या आसपास म्हणजे १९३७९.७७ वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक-निफ्टी ९७.९० (१.६८%) घसरणीसह ५७३५.३० वर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global woes drag bse sensex 347 points down banking infrastructure stocks hit
First published on: 01-10-2013 at 01:14 IST