कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ- ‘गोकुळ’ने आपले ‘गुड लाइफ’ हे दूध मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील ग्राहकांनाही विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात ही महामुंबई परिसरात विक्रीस सुरुवात करण्यात आली. नव्या क्षेत्रात झालेला विस्तार पाहता, दूधाची विक्री सध्याच्या ६.५० लिटर प्रति दिन पातळीवरून १० लाख लिटपर्यंत वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२० सालापर्यंत प्रति दिन २० लाख लिटरच्या दूध संकलनाचा संकल्प करण्याबरोबरच, नजीकच्या काळात दुधासह अनेक दर्जेदार गुणवत्तेची दुग्धजन्य उत्पादनेही बाजारात आणण्याचा गोकुळचा मानस आहे. मुंबईतील या कार्यक्रमाप्रसंगी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आणि गोकुळचे सर्व संचालक, संचालिका व अधिकारी उपस्थित होते.