जगाच्या तुलनेत भारतीयांना सोन्याचं आकर्षण सर्वाधिक आहे. सोनं अंगावर मिरवायला आणि बाळगायला भारतीयांना खूपच आवडतं. लग्न, सणासुदीला सोन्याचे दागिने घातले जातात. पिढ्यांपिढ्या सोन्याची भारतीय नागरिकांवर छाप पडली आहे. त्यामुळे सोन्याचं शून्य उत्पादन असलेल्या भारताचा आंतरराष्ट्रीय बाजारात दबदबा पाहायला मिळतो. मात्र गेल्या काही दिवसात सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. करोना महामारीच्या काळात सोन्यानं ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात काही अंशी दिलासा मिळाला खरा पण पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. अमेरिकेतील महागाई दर, कच्च्या तेलाच्या किमती आणि युक्रेन रशिया युद्धाचं सावट यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
महागाई, कच्च्या तेलाच्या किमती आणि युक्रेन रशिया युद्धाचं सावट यामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम जाणवत आहे. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेत महागाईने गेल्या चार दशकातील विक्रम मोडीत काढला आहे. महागाई दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणामही जाणवत आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सावटामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ९५ डॉलर्सच्या पुढे गेलेत. त्याचा सर्वस्वी परिणाम सोनाच्या किमतीवर होत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
कमोडिटी आणि चलन विश्लेषक भाविक यांच्या मते, रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी झालेला नाही. ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात भाव ५० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या पुढे जातील आणि सोनं महाग होण्याची शक्यता आहे.