ब्रिटनने युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजार घसरण झाल्यानंतर आता देशातील सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल १७०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदी देखील १४०० रुपयांनी महाग झाले आहे. एकीकडे सेन्सेक्समध्ये झालेली घसरण आणि दुसरीकडे सोने-चांदीचा दर वधारल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे.
सोन्याचा दर प्रति तोळ्यामागे ३१ हजार ७०८ रुपये इतका होता. त्यात आता १,७०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षातील सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. चांदीच्या दरात १,४०० रुपयांची वाढ होऊन चांदीचा प्रति किलो दर ४२,५०० रुपये इतका झाला आहे.