उद्यमशील, उद्य‘मी’
|| मकरंद जोशी
नु कत्याच आलेल्या बातमीनुसार अमेरिकेत होणाऱ्या इनसाईडर ट्रेडींग प्रकरणात भारतीय वंशजांच्या व्यक्तीच्या समावेशाच्या घटना वाढीला लागल्याचा उल्लेख होता.
२०१२ मध्ये रजत गुप्ताला ५ दशलक्ष डॉलरचा दंड आणि २ वर्षांंचा कारावास झाला होता. नुकत्याच झालेल्या अजून काही घटनांमध्ये कित्येक दशलक्ष डॉलरचा नफा उघडकीस होऊन जगन्नाथ नेल्लोरना अटक झाली आहे. परंतु इन्साईडर ट्रेडिंग हे परदेशी कंपनीतच होते असे नाही.
सेबी [Securities and Exchange Board of India (SEBI )]] ही भारतीय शेअर बाजाराची नियामक यंत्रणा आहे आणि ती नियमितपणे भारतीय शेअर बाजारावर लक्ष ठेऊ न असते आणि इन्साईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात दंड ठोठावत असते. भारतात अजून इन्साईडर ट्रेडिंग प्रकरणात कुणालाही अटक किंवा शिक्षा झालेली नाही; परंतु दंड दखलपात्र लावला जात आहे.
इन्साईडर ट्रेडिंग म्हणजे काय?
हा विषय भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या किंवा सूचिबद्ध होऊ घातलेल्या कंपन्या आणि त्यांच्या संबंधित लोकांना लागू होतो. सूचिबद्ध कंपनी व्यवहार करत असताना अनेक गोपनीय व्यवहारांवर काम करत असते. ते गोपनीय व्यवहार पूर्णत्वास गेल्यावर किंवा त्यासंबंधी काही महत्वाची घडामोड झाल्यावर त्याबद्दलची माहिती भांडवली बाजाराला कळवत असते. ही माहिती भांडवली बाजारामार्फत सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचल्यानंतर सूचिबद्ध शेअरच्या बाजारभावात फरक पडणे अपेक्षित असते. त्या काळात या गोपनीय व्यवहाराबद्दल माहिती असणाऱ्यांनी त्या शेअरमध्ये व्यवहार करणे याला इन्साईडर ट्रेडिंग असे म्हणतात. कायद्यानुसार अशी गोपनीय माहिती कोणालाही सांगणे अथवा त्या माहितीच्या जोरावर शेअर्समध्ये व्यवहार करणे हे निषिद्ध आहे आणि तसे झालेले आढळल्यास कठोर दंड ठोठावला जातो.
काही भारतीय प्रकरणे :
विजय मल्ल्याची युनायटेंड स्पिरिट्स ही कंपनी जेव्हा दिआगो या कंपनीला हस्तांतरित होणार होती तेव्हा दिआगो कंपनीत काम करणाऱ्या गुप्ते यांनी आपल्या काही नातेवाईकांच्या मदतीने युनायटेड स्पिरिट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये काही व्यवहार केले. हे नातेवाईक म्हणजे गुप्ते यांच्या पत्नीचे आई, वडील, भाऊ आदी होते. या प्रकरणात सेबीने १ कोटीचा नफा जप्त केला आणि त्यावर १२% व्याज लावून दंड ठोठावला. जागरण प्रकाशनमध्ये काम करणारी एक व्यक्ती आणि त्याच्या पत्नीने काही गोपनीय माहितीच्या आधारे शेअर्समध्ये व्यवहार केला आणि ४५ लाख रुपयांचा दंड झाला. हैद्राबादस्थित एका कंपनीचे संचालक बाला रेड्डी यांना अशाच एका प्रकरणामध्ये ४० कोटी रुपयांचा दंड झाला.
साधारणपणे दरमहा ५-६ या वेगात ही प्रकरणे सेबी हातावेगळी करत आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गोष्ट सिद्ध करणे सोपे झाले आहे. गंमत म्हणजे आपण एखाद्या कंपनीत काम करत असाल किंवा संबंधित असाल आणि आपण किंवा आपल्या नातेवाईकाने त्या कंपनीत काही शेअर्सचे व्यवहार केले आणि त्याच काळात त्या कंपनीत काही गोपनीय महत्वाचे व्यवहार घडत असतील तर आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या कायद्याबद्दलची माहिती अनेक जणांना नसल्यामुळे काही सामान्य नागरिक यामध्ये शिक्षेला पात्र ठरत आहेत.
नुकत्याच जाहीर झालेल्या एका घटनेमध्ये फेसबुक मित्र हा देखील अशा प्रकारे इन्साईडर ट्रेडिंगमध्ये अडकू शकतो. एका प्रकरणामध्ये एका कर्मचाऱ्याने काही शेअर्सचे व्यवहार केले त्यामध्ये त्याला १७,००० चा नफा झाला. त्यावर सेबीने १२,००,००० रुपयाचा दंड ठोठावला. अपील लवादाने तो दंड २,००,००० पर्यंत कमी केला. नव्या कायद्यानुसार अशा प्रकरणात किमान १०,००,०००चा दंड होऊ शकतो. तसेच हा दंड कमावलेल्या नफ्याच्या किंवा वाचवलेल्या तोटय़ाच्या तीन पट दंड असू शकतो.
संकट येऊ नये म्हणून काय करता येईल?
१) तुम्ही भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनीमध्ये काम करत असाल किंवा त्याच्याशी संबंधित सल्लागार, वितरक असाल तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये व्यवहार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
२) ही खबरदारी आपल्या नातेवाईकांनाही सांगावी.
३) कुठल्याही मिळालेल्या टिपच्या आधारे व्यवहार टाळावे.
४) अशा प्रकारच्या बातम्या चर्चेला येणाऱ्या समाजमाध्यमातून मधून बाहेर पडावे.
नुकत्याच जाहीर झालेल्या सेबीच्या योजनेनुसार अशा व्यवहाराबद्दल माहिती देणाऱ्या खबरी (्रल्लऋ१ेी१ ) ला सेबी दंडाच्या १०% रक्कम बक्षीस देणार आहे व त्याचे नाव गोपनीय राखणार आहे. एकूणच इन्साईडर ट्रेडिंग हा विषय आपल्याकडे अजून तापत जाणार असे दिसत आहे!
(लेखक कंपनी सचिव आहेत.) makarandjoshi@mmjc.in