मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५५०० कोटींची गुंंतवणूकदारांची देणी थकविणाऱ्या नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लि.च्या घोटाळ्यात या बाजारमंचाची प्रवर्तक असलेल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष जिग्नेश शाह यांच्यासह त्याचे खंदे साथीदार जोसेफ मॅसी, श्रीकांत जवळगेकर आणि शंकरलाल गुरू यांच्या मालमत्तांवर जप्ती, शेअर्स गोठविणे आणि बंगले व रो हाऊसेसना ठाळे ठोकणे अशी कारवाई केली.
पोलिसांनी बुधवारी केलेल्या या कारवाईत जिग्नेश शाह यांचे उपनगरातील जुहूस्थित बंगल्याला सील ठोकण्यात आले. या चारही जणांकडून जप्त केलेल्या एकूण मालमत्तेची किंमत ही १९२ कोटी रुपयांच्या घरात जाणारी आहे. या शिवाय शाह यांचा पुण्यातील भूखंड, गोरेगावस्थित आरे कॉलनी येथील फ्लॅटची कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेतील ११.७५ कोटींच्या मुदत ठेव पत्रे, एफटी समूहातील कंपन्यांच्या समभागांमधील गुंतवणुकाही गोठविण्यात आल्या आहेत. शाह यांच्या नावे असलेल्या विविध पाच डिमॅट खात्यांचा तपशीलही पोलिसांकडून अभ्यासला जात आहेत. गोठवलेल्या व जप्त मालमत्तांची एनएसईएल घोटाळ्याच्या सुनावणी करणाऱ्या न्यायालयाने परवानगी देईपर्यंत या मंडळींना विक्री करता येणार नाही.