सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी आणि भांडवली बाजारातील प्रचंड मोठी गुंतवणूकदार संस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांनी बुधवारी सायंकाळी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती.
रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे. रॉय यांनी राजीनाम्याची इच्छा यापूर्वीही व्यक्त केली होती असे समजते. त्यांच्या जागी नव्या उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया येत्या महिन्यात पूर्ण होईल, तोवर रॉय हेच अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील.
या अवधीत महामंडळात कार्यरत पात्र उमेदवारांमधून नव्या अध्यक्षांच्या निवडीचे संकेत केंद्रीय अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासाठी मुलाखतीची प्रक्रिया राबविली जाईल, असे त्यांनी सांगितले. सेवाज्येष्ठतेनुसार, सध्या व्ही. के. शर्मा व उषा सांगवान या दोन व्यवस्थापकीय संचालकपदावरील व्यक्तींची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या स्तरावरील आणखी एक पद सध्या रिक्त आहे.
जून २०१३ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत रॉय यांची पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते १९८१ पासून महामंडळाच्या सेवेत आहेत. अध्यक्षपदी बसण्याच्या एक महिना आधी कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी पदोन्नती मिळविली होती. एलआयसीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या कारकीर्दीत एलआयसीचा ६५ टक्क्यांवर घसरलेला बाजारहिस्सा पुन्हा ७१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
एलआयसीत प्रघातच!
अध्यक्षाने मुदतीपूर्वी बाहेर पडण्याचा एलआयसीत परंपराच राहिली आहे. या आधी माजी अध्यक्ष जी. एन. वाजपेयी हे मुदतीपूर्वी राजीनामा देऊन सेबीच्या संचालक मंडळावर गेले होते. रॉय यांच्यापूर्वीचे अध्यक्ष टी. एस. विजयन हेही संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच विमा नियामक प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून रुजू झाले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2016 रोजी प्रकाशित
‘एलआयसी’ अध्यक्षांची मुदतपूर्व निवृत्ती
रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 24-06-2016 at 07:15 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lic chairman s k roy resigns two years before his term ends