भागभांडवल आणि महसूल कमी असला तरी नफ्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या आणि दीर्घ कालावधीत आकर्षक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या भांडवली बाजारातील स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूकपूरक ठरणारा नवा म्युच्युअल फंड एल अॅण्ड टीने सोमवारी सादर केला आहे. ‘इमर्जिग बिझनेस’ नावाचा हा फंड क्लोज्ड आणि ओपन अशा दुहेरी पर्यायात उपलब्ध असून त्यासाठी प्रारंभिक गुंतवणूक मंगळवारपासूनच खुली होत आहे.
भांडवली बाजारातील लार्ज आणि मिड कॅप समभागांच्या तुलनेत गेल्या दशकभरात कमी प्रतिसाद मिळालेल्या स्मॉल कॅपमधील समभागांमधील गुंतवणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या या फंडात किमान ५ हजार रुपये गुंतवणूक येत्या ६ मेपर्यंत करता येणार आहे. यासाठी सुरुवातीची दोन वर्षे ही गुंतवणूक मुदतबंद (क्लोज एंडेड) स्वरूपाची असेल, तर नंतरच्या कालावधीसाठी ती पद्धतशीर गुंतवणूक योजनेंतर्गत (एसआयपी) सुरू राहील.
मनोरंजन, दूरचित्रवाहिन्या माध्यम, वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ई-कॉमर्स व्यवहारातील कंपन्या यांचा अधिकतर समावेश असलेल्या स्मॉल कॅपमधील काही कंपन्यांमध्ये पाच वर्षांत एक लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर ६ ते २१ लाख रुपये झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. एस अॅण्ड पी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक आधार मानला जाणाऱ्या या फंडासाठी कंपनीने ‘उच्च जोखीम’ (ब्राऊन कलर) म्हणून दर्जा दिला आहे.
मार्च २०१४ अखेर १८,२२५ कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एल अॅण्ड टी म्युच्युअल फंड कंपनीने या नव्या फंडाच्या माध्यमातून १५० ते २०० कोटी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट राखले आहे. २५ विविध फंड असणाऱ्या कंपनीची ५०० कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हे समभाग निगडित क्षेत्रात होते. फिडेलिटीचा हा व्यवसाय ताब्यात घेण्यासह एल अॅण्ड टीने या क्षेत्रात पदार्पण केले होते.
सध्या मूल्यापेक्षा कमी पातळीवर प्रवास करणाऱ्या मात्र आगामी कालावधीत मोठी क्षमता असलेल्या कंपनी समभागांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल, असे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशू सुयश यांनी सांगितले. ‘इमजिर्ंग फंड’च्या माध्यमातून गुंतवणूक करता येऊ शकणाऱ्या ‘स्मॉल कॅप’मधील कंपन्यांना उज्ज्वल भविष्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
एल अॅण्ड टीने या फंडसाठी यंदा लक्ष्य केलेल्या स्मॉल कॅपमधील कंपन्यांची उलाढाल ही ५ हजार कोटी रुपये असली तरी त्यातील अनेक कंपन्यांचा करोत्तर नफा हा १५० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे, असे नमूद करून कंपनीच्या या फंड व्यवसाय विभागाचे व्यवस्थापक सौमेन्द्र लाहिरी यांनी या क्षेत्रातील समभागांचा प्रतिसाद, मूल्य तसेच परतावा वृद्धिंगत होण्याची अधिक चिन्हे असल्याचे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
‘स्मॉल कॅप’मधील गुंतवणुकीसाठी ‘एल अॅण्ड टी’चा नवा म्युच्युअल फंड
भागभांडवल आणि महसूल कमी असला तरी नफ्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या आणि दीर्घ कालावधीत आकर्षक परतावा देण्याची क्षमता असणाऱ्या भांडवली बाजारातील स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूकपूरक ठरणारा नवा म्युच्युअल फंड एल अॅण्ड टीने सोमवारी सादर केला आहे.
First published on: 22-04-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lt new mutual fund for small cap investment