औषध कंपन्यातील आघाडीची कंपनी असलेल्या लुपिन लिमिटेडच्या वतीने एलजी लाइफ सायन्सेस (दक्षिण कोरिया) समवेत संरचनात्मक विपणन कराराची घोषणा करण्यात आली आहे. या करारानुसार आता बासुजिन या नाममुद्रेंतर्गत विकले जाणारे ग्लारजिन या नॉव्हेल इन्सुलिन अ‍ॅनोलॉगचे भारतात वितरण केले जाणार आहे. पारंपरिक इन्शुलिन बाजारपेठेत लुपिनने दुसरे स्थान मिळवले आहे आणि एप्रिल २०१४ मध्ये ही बाजारपेठ १०.८२ टक्क्यांनी वाढली आहे. इन्शुलिन ग्लारजिन दिवसभरात एकदाच घेण्याचे निर्देश देण्यात आले असून याचा उपयोग टाइप-१ डायबिटिसमधील प्रौढ रुग्णांच्या उपचाराकरिता केला जातो किंवा टाइप-२ डायबिटिसमध्ये ज्या रुग्णांना हायपरग्लायसेमिया नियंत्रणात ठेवण्यासाठी बेसल इन्शुलिन (दीर्घ काळ परिणाम करणारे) वापरण्याची गरज असते त्यांच्याकरिता उपयोग केला जातो. इन्शुलिन ग्लारजिन इन्सुलिनचे प्रमुख काम हे ग्लुकोजचे नियमन करणे आहे.
भारतातील औषध बाजारपेठेमध्ये (आयपीएम) मधुमेहाच्या बाजारपेठेचा विस्तार ६,०३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून १८ टक्के वाढ (आयएमएस मॅट : एप्रिल २०१४) दिसून आली. इन्शुलिन अ‍ॅनोलॉग बाजारपेठेचा विस्तार ५८५ कोटी रुपयांपर्यंत झाला असून तीन वर्षांत २४ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. ग्लारजिन बाजारपेठ २१८.५० कोटी रुपयांची असून तीन वर्षांमध्ये २३ टक्के वाढ झाली आहे.