आता नाव प्रिमियम हॅचबॅक कारसाठी सामान्यांसाठी कार निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या देशातील सर्वात जुन्या मारुती सुझुकीने तिच्या प्रिमियम हॅचबॅक श्रेणीतील नवी कारचे अनावरण सोमवारी जागतिक स्तरावर एकदम केले. पेट्रोल तसेच डिझेलवर धावणाऱ्या बलेनो नावाच्या या कारची किंमत ४.९९ ते ८.११ लाख रुपये असून ती ह्य़ुंदाई आय२०, होन्डा जॅझ, फोक्सव्ॉगन पोलोंना ऐन सणांमध्ये टक्कर देईल. सध्या स्पर्धक कंपन्यांच्या या गटातील कारची किंमत ५.३४ ते ८.६३ लाख रुपये आहे. तुलनेत मारुती सुझुकीने सादर केलेली बलेनो ही तुलनेत स्वस्त आहे. नवागत विदेशी कंपन्यांमुळे गेल्या काही महिन्यांमध्ये मारुतीचा बाजार हिस्सा निम्म्याच्याही खाली आला आहे. २०२० पर्यंत कंपनीने वार्षिक २० लाख वाहन विक्रीचे ध्येय राखले आहे. बलेनो ही एस-क्रॉसप्रमाणेच भारतात नेक्सा या कंपनीच्या विशेष दालन साखळीद्वारेच विकण्यात येणार आहे. पेट्रोल बलेनो २१.४ किलो मीटर प्रति लिटर तर डिझेल बलेनो २७.३९ किलो मीटर प्रति लिटर इंधन क्षमता देईल. पेट्रोलवरील नवी कार ४.९९ ते ७.०१ लाख रुपये तर डिझेलवरील कार ६.१६ ते ८.११ लाख रुपये (एक्स शोरुम-नवी दिल्ली) दरम्यान उपलब्ध आहे. भारतात या गटातील प्रवासी कारचा हिस्सा एकूण कारपैकी २० टक्के आहे. वर्षांला अशा वाहनांची विक्री देशात ५.३० लाखापर्यंत होते. एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्ध वार्षिकातच त्या २.९० लाख विकल्या गेल्या आहेत.
जपानमध्ये पहिली ‘मेड इन इंडिया’ कार जाणार
नव्या बलेनोच्या माध्यमातून मारुती सुझुकी प्रथमच ‘मेड इन इंडिया’ कार जपानमध्ये निर्यात करणार आहे. सोमवारीच प्रिमियम हॅचबॅकचे जागतिक स्तरावर सादरीकरण झाल्यानंतर बलेनो जपानसह विविध १०० हून अधिक देशांमध्ये जानेवारी २०१६ पासून उपलब्ध होईल. ही संख्या वार्षिक ३०,००० ते ५०,००० असण्याची अंदाज आहे. पैकी ६,००० बलेनो पहिल्या वर्षांत जपानला रवाना होण्याची शक्यता आहे. नव्या कारसाठी कंपनीने १,०६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मारुतीची या नावाची कार २००० च्या दशकातही होती. मात्र सेदान प्रकारातील होती. २००६ मध्ये बंद करण्यात आली. स्विफ्ट डीझायर अथवा एसएक्स४ पूर्वीची ती स्थिती होती. तेच नाव घेऊन कंपनी हॅचबॅकच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाहन बाजारपेठेतील आपला हिस्सा भक्कम करू पाहत आहे.