नव्या वर्षांत ४जी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन येणाऱ्या रिलायन्स जिओच्या भारतीय दूरसंचार क्षेत्रातील पदार्पणाने देशात एकूणच स्पर्धात्मक वातावरण तयार होणार असून यामुळे इंटरनेट दरांमध्ये तब्बल २० टक्क्य़ांपर्यंत घसरण येईल, असे ‘फिच रेटिंग्ज’ या आंतरराष्ट्रीय पतसंस्थेला वाटत आहे.
मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओच्या ४जी दूरसंचार सेवेला २०१५ मध्ये प्रारंभ होणार आहे. या सेवेसाठी देशव्यापी ध्वनिलहरी परवाना मिळालेली रिलायन्स ही एकमेव कंपनी आहे. ऑक्टोबर २०१४ मध्येच अपेक्षित असलेल्या या सेवेला आणखी विलंब लागणार आहे. आता जून २०१५ पर्यंत प्रत्यक्षात ही सेवा प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
मात्र यामुळे २००९ ते २०१३ दरम्यान दूरसंचार क्षेत्राने अनुभवलेल्या दर युद्धासारखे चित्र यंदा उमटणार नाही, असे फिचने म्हटले आहे. रिलायन्स जिओच्या प्रत्यक्ष सेवा प्रारंभाच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर, रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण होणार असून यामुळे इंटरनेट दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
देशातील प्रमुख चार दूरसंचार कंपन्यांचा महसुली हिस्सा सध्याच्या ७९ टक्क्यांवरून येत्या वर्षांत ८३ टक्के होईल, असेही फिचने म्हटले आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्र सध्या ३० अब्ज डॉलरचे आहे.
मोबाइलधारकांमध्ये सध्या वाढत्या स्मार्टफोन वापरामुळे इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यातच रिलायन्स जिओ अतिजलद ४जी तंत्रज्ञान घेऊन येणार आहे. यामुळे इंटरनेटचे दर २० टक्क्यांपर्यंत खाली येतील, असे फिचला वाटते.
४जी तंत्रज्ञानासाठी रिलायन्स जिओने ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून नेटवर्क भागीदारीसाठी अधिकाधिक दूरसंचार कंपन्यांच्या मनोरे साहाय्यासाठी करारही पार पाडले आहेत. यामध्ये अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचाही समावेश आहे.