चांगला प्रतिसाद देणाऱ्या के श्रेणीतील इंजिनाचा मारुतीने तिच्या नव्या अल्टो या छोटय़ा कारमध्ये समावेश केला आहे. कंपनीची अल्टो के१० ही कार स्वयंचलित गिअरनेही अद्ययावत करण्यात आली आहे. स्वयंचलित गिअर असलेली कंपनीची ही दुसरी कार आहे. यापूर्वी ही यंत्रणा सिलेरिओमध्ये अस्तित्वात आणली आहे. या नव्या अल्टोची किंमत ३.८२ लाख रुपये (एक्स शोरूम – नवी दिल्ली) आहे.
अल्टो के१० सादर करताना ती १५ टक्के अधिक इंधन क्षमता देणारी असल्याचा दावा या वेळी मारुती सुझुकी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा यांनी केला. नवी कार सीएनजी इंधनावरही उपलब्ध असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पारंपरिक गिअर यंत्रणेतील पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या सध्याच्या अल्टो के१०ची किंमत ३.०६ ते ३.८२ लाख रुपये आहे.
पेट्रोलवरील अल्टो के१०ची इंधन क्षमता २४.०७ किलोमीटर प्रतिलिटर, तर सीएनजीवरील वाहनाची इंधन क्षमता ३२.२६ किलो मीटर प्रतिकिलो ग्रॅम आहे. सहा विविध प्रकारांत ती उपलब्ध आहे.
नव्या कारच्या निर्मितीसाठी कंपनीला २०० कोटी रुपयांचा खर्च आला असून कंपनीच्या सध्याच्या व्यासपीठावरच ती तयार करण्यात आली आहे; मात्र कंपनीने अभियांत्रिकी सहकार्य तिच्या जपानच्या मुख्य कंपनीचे घेतले आहे.
नव्या वाहनामुळे एकूण अल्टोची विक्री १० टक्क्य़ांनी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तर स्वयंचलित गेअर प्रकारातील अल्टो विक्रीत २० टक्के हिस्सा राखेल, असा आशावादही यानिमित्ताने कंपनीने व्यक्त केला आहे.
अल्टो या नाममुद्रेंतर्गत कंपनीने सर्वप्रथम २००० मध्ये कार सादर केली होती. कंपनीने एकूण २६ कार विकल्या असून अल्टो के१० या गेल्या चार वर्षांत चार लाखांहून विकल्या गेल्या आहेत. तिची किंमत सध्या ३.१५ ते ३.३१ लाख रुपयांदरम्यान आहे.
भारतीय प्रवासी वाहन बाजारपेठेत मारुती कंपनी पहिल्या स्थानावर असून तिच्या ताफ्यात विविध १३हून अधिक वाहन प्रकार आहेत. कंपनीने छोटय़ा प्रवासी कार विक्रीत मात्र एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान २.६ टक्के घसरण नोंदविली आहे.