कोकण किनारपट्टीचा विकास करण्यासाठी आणि राज्यातील उद्योग जगताला आयात-निर्यातीसाठी उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बंदरांच्या विकासाला प्राधान्य राहिल. याचाच एक भाग म्हणून जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याच्या प्रकल्पाचा सामंजस्य करार आज होत आहे.
राज्याच्या दृष्टीने ही घटना खूप महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.
सह्य़ाद्री अतिथीगृहावर राज्य सरकारच्यावतीने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोकण रेल्वे महामंडळ आणि जयगड पोर्ट लि.(जेएसडब्लू) यांच्या दरम्यान जयगड बंदर कोकण रेल्वेला जोडण्याबाबत सामंजस्य करार झाला. यावेळी बोलतांना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
खाजगीकरणातून बंदरांचा विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.  त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातील धामणखोल-जयगड येथे बहुउद्देशिय बारमाही बंदर जयगड पोर्ट लि. या खाजगी विकासकामार्फत विकसित केले जात आहे.
याचा पहिला टप्पा पूर्वीच कार्यान्वित झाला असून प्रतिवर्षी सुमारे साडेसहा दशलक्ष टन माल या बंदरातून हाताळला जातो. आता हे बंदर रेल्वेशी जोडल्यानंतर दरवर्षी ५० दशलक्ष टन इतकी माल हाताळणी क्षमता निर्माण होईल.
कोकण रेल्वे महामंडळाने जयगड बंदर ते डिगणी (संगमेश्वर) हा ३८ कि.मी.चा जोड रेल्वेमार्ग तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.  केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या एकेरी मार्गाचा खर्च ७७५ कोटी रूपये आहे. हा प्रकल्प कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड आणि जयगड पोर्ट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
सुमारे ३० महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होऊन जयगड बंदर कोकण रेल्वेद्वारे संपूर्ण देशाशी जोडले जाईल.