अल्प व्याजदर कपातीने ओढवलेली निराशेत, केंद्रातील राजकीय अस्थिरतेतून निर्माण झालेल्या चिंतेची भर पडल्याने, मुंबई शेअर बाजार मंगळवारी जवळपास ३०० अंशांने गटांगळ्या खात १९ हजारावर येऊन आपटला. तर ९० अंश नुकसानाने निफ्टीही ५,७५० नजीक आला आहे. आजच्या घसरणीने ‘सेन्सेक्स’ने पंधरवडय़ापूर्वीच्या नीचांकी पातळीला पुन्हा गवसणी घातली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण जाहीर होण्यापूर्वी ‘सेन्सेक्स’मध्ये ३० अंशांपर्यंतची घसरण नोंदली जात होती. दुपारच्या सत्रापूर्वी पाव टक्का व्याजदराची घोषणा होताच त्यातील घसरण ५० अंशांपर्यंत विस्तारली. वाढती अन्नधान्य महागाई आणि चालू खात्यातील तूट याबाबत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर आगामी कालावधीत व्याजदर कपातीस पुरेसा वाव नसल्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेताने मात्र यानंतर बँक, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू आदी क्षेत्रांवरील दबाव निर्माण झाला.
असे असतानाच केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या द्रमुक पक्षाच्या घोषणेची भांडवली बाजाराने अधिक दखल घेतली. लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकांना वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना अस्थिर झालेल्या सरकारच्या संख्याबळामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा अधिक सपाटा लावला.
गेल्या सलग तीन सत्रात मुंबई शेअर बाजाराने तब्बल ५६२.३४ अंशांची घसरण नोंदविली आहे. आजच्या घसरणीने मुंबई निर्देशांक ५ मार्चच्या १९ हजाराच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. ’ दिवसअखेर ८९.३० अंश घसरणीने निफ्टी ५,७४५.९५ पर्यंत खाली आला आहे.