अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांसह देशाच्या बँक नियामकानेही कमी दर असण्याचे मान्य केले असतानाच महिनाअखेर जाहीर होणाऱ्या पतधोरणात पाव टक्का दरकपातीसाठी विविध क्षेत्रांतून दबाव वाढत आहे. उद्योगक्षेत्राकडून यंदा तरी रोख राखीव प्रमाणात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली असतानाच अन्य व्यापारी बँका थेट रेपो दरातील कपातीचा आग्रह धरत आहेत. तर आघाडीचे अर्थविश्लेषकही यंदा पाव टक्का दरकपात होईल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेकडून रोख राखीव प्रमाणात किमान पाव टक्क्याची कपात केली जाऊ शकते, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचने व्यक्त केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील रुपयातील अस्थिरतेपोटी मध्यवर्ती बँकेला रेपो दरासारख्या मुख्य दरात कपात करणे अटकाव ठरू शकते, असेही बँकेने म्हटले आहे. बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचने म्हटले आहे की, रुपयातील अस्थिरतेने यापुढे रेपो कपातीसाठी अटकाव केला तरी रिझव्‍‌र्ह बँक रोख राखीव प्रमाणात पाव टक्क्यांपर्यंत कपात करू शकते. यंदाच्या चांगल्या मान्सूनमुळे चालू आर्थिक वर्षांत पाऊण टक्क्यांपर्यंत दरकपात होऊ शकते.
रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण ३० जुलै रोजी जाहीर होत आहे. गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी अन्य व्यापारी बँकांना त्यांच्या कर्ज व्याजदरात कपात करण्याचा आग्रह केला होता. तत्पूर्वी दिल्लीत बोलाविण्यात आलेल्या बँकप्रमुखांच्या बैठकीतही केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्याजदर कपातीसाठी आवाहन केले होते.