मुंबई : गेली कैक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर बाजारात गुंतवणुकीविषयी जनसामान्यांमध्ये जागृतीचे काम करीत अर्थसाक्षरतेत मोलाचे योगदान देणारे सीडीएसएलचे गुंतवणूकदार शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांच्या ‘श.. शेअर बाजाराचा’ हे व्याख्यान पर्व येत्या शनिवारी मैलाचा दगड पार करीत आहे. ४ ऑक्टोबर २०१४ रोजी बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्या संकुल, हिंदू कॉलनी, दादर येथे त्यांच्या व्याख्यानाचे १००० वे पुष्प गुंफले जाणार आहे.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) ३२ वर्षे, तर सीडीएसएलमध्ये १४ वर्षे असा शेअर बाजाराशी संलग्न कामाचा तब्बल ४६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले ठाकूर हे अनेक वर्षांपासून या गुंतवणूक पर्यायाबाबत लोकांमध्ये गोडी व समज निर्माण व्हावी यासाठी अथक प्रयत्नरत आहेत. शेअर व्यवहाराच्या पद्धती, डिमॅटची प्रक्रिया, शेअर बाजाराविषयक गैरधारणा, गुंतवणूकदारांनी घ्यावयाची दक्षता आणि कर्तव्ये वगैरे बाबी अत्यंत सुबोध व सोप्या भाषेत आणि स्लाइड शोद्वारे सादरीकरणातून ठाकूर यांनी व्याख्यानाद्वारे लोकांपर्यंत नेल्या आहेत. प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांच्या शंका-प्रश्नांचे समाधान करण्याचा शिरस्ताही त्यांनी पाळला आहे. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत हे शनिवारच्या १००० व्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रम संपूर्ण विनामूल्य आहे.