महामुंबईसह पनवेल, लोणावळापर्यंतचे गृहप्रकल्प
क्रेडाई आणि बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या विद्यमाने दरवर्षी भरविण्यात येणारे मालमत्ता प्रदर्शन या वर्षी नवीन वर्षांत ८ ते ११ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष धमेंद्र कारिया, माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी, वरिष्ठ उपाध्यक्ष मनिष भतिजा, भूपेंद्र शाह, हरेश छेड्डा, वसंत भद्रा,रसिक चौहान आदी पदाधिकार्यानी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मालमत्ता प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली.
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात होणाऱ्या या प्रदर्शनात एकूण १४३ स्टॉल्स असणार आहेत. नवी मुंबईसह पनवेल, लोणावळा इत्यादी भागातील गृहप्रकल्प आणि वाणिज्यिक बांधकामांची माहिती मिळणार आहे. महागडय़ा घरांसोबतच परवडणाऱ्या घरांचे पर्याय देखील ग्राहकांना या प्रदर्शनात निवडता येणार आहेत. ३०० वर्गफुट ते दहा हजार वर्गफुटांपर्यत क्षेत्रफळाची आणि ११ लाखांपासून ते २० करोड रुपयांपर्यत किंमत असणारी घरे उपलब्ध आहेत. वाजवी व्याजदरात गृहकर्ज देणार्या वित्तीय संस्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी असणार आहेत. सुमारे 5 लाख नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास बिल्डर्स असो.ऑफ नवी मुंबईच्या पदाधिकार्यानी व्यक्त केला आहे.