लोकसभेच्या निवडणुकानंतर स्थिर सरकार सत्तेवर येईल याबाबत बाजाराच्या प्रचंड आशा एकवटल्या असून, जर त्या विपरीत पूर्ण बहुमत नसलेल्या अस्थिर सरकारचा घाट निकालानंतर रचला गेल्यास, भांडवली बाजार आणि कदाचित रोखे आणि चलन बाजारातही मोठय़ा ‘उलथापालथी’चा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला.
निवडणुकानंतर स्थिर सरकारच्या हाती सत्ता जाण्याचे तसेच त्या परिणामी धोरणात्मक आघाडीवर सक्रियता येण्याच्या पूर्वानुमानाने बाजार तेजीवर स्वार झालेला दिसून येतो, पण प्रत्यक्षात तसे घडले नाही तर निश्चितच निराशा होईल आणि शेअर बाजारात त्याची लगोलग प्रतिक्रिया उमटलेलीही दिसून येईल. पण कदाचित रोखे बाजार आणि चलन बाजारातही त्याचे पडसाद उमटतील आणि मोठय़ा पडझडीची तयारी आपल्याला ठेवावी लागेल, असे राजन यांनी पतधोरणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मार्च महिन्यात याच आशेच्या हिंदोळ्यावर भांडवली बाजारात निर्देशांकाने तब्बल ६ टक्क्य़ांची, तर रुपयाने डॉलरमागे ६०ची पातळीखाली मजबुती मिळविली आहे.  राजन यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, जरी अस्थिर स्वरूपाचे सत्ता-समीकरण केंद्रात जुळविले गेले तरी या सरकारकडून जर अर्थव्यवस्था आणि वित्तीय व्यवस्थापनाशी संलग्न महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत सक्रियता दिसल्यास गुंतवणूकदारांकडून त्याचे सकारात्मक अवलोकन केले जाईल याची आपल्याला खात्री आहे. रिझव्‍‌र्ह बँकही या स्थितीकडे उत्सुकतेने पाहत असल्याचे नमूद करून, भविष्यात यासारख्या स्थितीतून उद्भवणाऱ्या विपरीत परिणामांपासून प्रतिबंध म्हणून देशाचा आर्थिक ताळेबंद सशक्त बनविणे हाच अस्सल उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीच्या रोख्यांकडे आकर्षित करणे हे ताळेबंदाच्या सशक्तच्या दिशेने एक पाऊल ठरेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नव्याने येणाऱ्या सरकारकडून जूनमध्ये जेव्हा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाईल, तेव्हा ते सरकारी खर्चात वाढीऐवजी गुंतवणुकीला चालना देण्यावर केंद्रित असेल अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.

ताळेबंदातील ‘दिखाऊ सजावटी’च्या प्रवृत्तीवर सरकारी बँकांना कानपिचक्या
प्रत्येक आर्थिक वर्षांच्या सांगतेला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कामगिरीबाबत निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी केल्या जाणाऱ्या ‘दिखाऊ सजावटी’ (विंडो ड्रेसिंग)च्या प्रवृत्तीवर गव्हर्नर राजन यांनी कठोर टीका केली. अशी चुकीची धोरणे अनुसरून खड्डय़ात जाणाऱ्या बँकांना भविष्यात रिझव्‍‌र्ह बँक तारणार नाही, असेही त्यांनी सुनावले. वर्ष सांगता ही बँकिंग प्रणालीसाठी विनासायास असायला हवी, ती विलक्षण फेरबदलाची असू नये, असेही त्यांनी नमूद केले. बँकिंग व्यवस्था जर स्वत:च समस्या ओढवून घेत असेल, तर अशा बँकांना तारण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने काही करावे असे मला वाटत नाही. प्रत्येक वर्ष सांगतेला अनेक बँका आपल्या ताळेबंदाला न जाणो अनेकानेक कारणांमुळे विशिष्ट रूप देण्याचा प्रयत्न करीत असतात. काही बँका त्यांच्या जोखीमभारीत मालमत्तेला कमी दाखवून त्यायोगे आपल्या भांडवली पूर्ततेचे प्रमाण कमी करताना दिसतात, तर सरकारी बँकांकडून मालमत्तेत वाढीचा देखावा केला जातो, जेणेकरून सरकारने कामगिरीविषयक घालून दिलेले लक्ष्य गाठल्याचे दाखविले जाऊ शकेल. या प्रवृत्ती चुकीच्या असून, त्यावर राजन यांनी सडकून टीका केली.