मुंबई : रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून ऑगस्टमध्ये सुमारे १३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्ची करण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. डॉलरच्या तुलनेत चलन ८० रुपयांच्या पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी बँकेने चालू आर्थिक वर्षांत मासिक आधारावर परकी चलन व्यवहारात केलेला मोठा हस्तक्षेप आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, २९ जुलै ते २ सप्टेंबर या सलग पाच आठवडय़ांत परकीय चलनाचा साठा सुमारे २१ अब्ज डॉलरने घसरून ५५३.१ अब्ज डॉलरवर आला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारताचे चलन म्हणजे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर स्थिर व्हावे हे निश्चित केलेले नसले तरी डॉलरच्या तुलनेत त्यात मोठी पडझड होऊ न देण्यावर कटाक्ष असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात मध्यवर्ती बँकेकडून डॉलरच्या तुलनेत रुपया ८० रुपयांच्या पातळीवर राखण्यास प्रयत्न केले जात आहे. परिणामी गेल्या महिन्याभरात रुपयाची घसरण रोखण्यासाठी डॉलरची आक्रमकपणे विक्री पाहायला मिळत असल्याचे मत चलन बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. गेल्या महिन्यात २९ ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८०.१३ ही ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती.

गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत बाजाराकडे पाठ फिरवलेल्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्थिर विनिमय दर अत्यंत आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कडाडलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे रुपयात मोठी घसरण झाली. याचीच परिणती म्हणून विकास गतीदेखील धिमी झाली. मात्र देशाला परदेशी गुंतवणुकीचे पसंतीचे ठिकाण बनवायचे असेल तर, स्थिर विनिमय दर असणे आवश्यक आहे, असे मत एचडीएफसी बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष भास्कर पांडा यांनी व्यक्त केले.

परकीय गंगाजळी २३ महिन्यांच्या नीचांकी

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत घसरण कायम आहे. सरलेल्या आठवडय़ात गंगाजळी सुमारे ७.९ अब्ज डॉलरने आटत ५५३.११ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गंगाजळी २३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच ९ ऑक्टोबर २०२० च्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी सप्टेंबर (२०२१) महिन्यात परकीय चलन गंगाजळीने ६४२.४५३ अब्ज डॉलर अशी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर भांडवली बाजारात नवीन वर्षांत आलेली घसरण, खनिज तेलाच्या दराने गाठलेला उच्चांक आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील मूल्य घसरण रोखण्यासाठी डॉलरची विक्री करत असल्याने  परकीय चलन गंगाजळीत उतार कायम आहे.