महागाई दराचा काबूत न येणारा आडमुठेपणा पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेने येत्या काळातही व्याजाचे दर वाढवणे कायम ठेवले पाहिजेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आएमएफ)ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात प्रतिपादन केले. यापूर्वी आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कारकीर्द राहिलेले गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी किरकोळ महागाईवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरणही या अहवालाकडून कौतुकास्पद ठरले आहे.
आयएमएफच्या या अहवालाने, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर हा आगामी वर्षांत दोन अंकी स्तरावरच राहणे अपेक्षिले आहे. प्रामुख्याने त्यातील अन्नधान्य घटकांच्या चढय़ा किमतीमुळे हा दर ओसरणे शक्य नसल्याचे हा अहवाल सांगतो. रिझव्‍‌र्ह बँकेने आपले पतधोरण ठरविताना, या निर्देशांकालाच केंद्रस्थानी ठेवण्याचा घेतलेला पवित्रा स्पृहणीय असल्याचे नमूद करीत या अहवालाने महागाईविरोधी हा पवित्रा अधिक कठोर होण्याची गरज प्रतिपादित केली.
लक्षणीय बाब म्हणजे आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा दरही रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी अलीकडे केलेल्या भाकीताप्रमाणेच अंदाजला आहे. मार्चअखेर संपणाऱ्या विद्यमान आर्थिक वर्षांत हा दर ४.६ टक्के असेल, तर आगामी २०१४-१५ आर्थिक वर्षांत तो ५.४ टक्क्यांचा स्तर गाठेल, असा आयएमएफचा कयास आहे.