अनिल धीरूभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या ४जी तंत्रज्ञानावरील दूरसंचार सेवेकरिता थोरले बंधू मुकेश अंबानी यांच्या ‘आरजिओ’चे तांत्रिक सहकार्य घेण्यात आले आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स तिची ४जी सेवा प्रथमच देशात येत्या महिन्यापासून दोन टप्प्यांमध्ये सुरू करत आहे. त्यासाठी आवश्यक असलेले दूरसंचार जाळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या लवकरच परिपूर्ण स्वरूपात येऊ घातलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम (आरजिओ) वर विस्तारले जाणार आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रति १० गिगाबाइट्स ९३ रुपये दरांपासून ही सेवा सुरू करेल. या सेवा क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांचे दर सध्या याच स्तरानजीक आहेत. येत्या आठवडय़ापासून सीडीएमए तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आरजिओचे जाळे उपलब्ध केले जाईल, अशी माहिती रिलायन्स कम्युनिकेशन्सने दूरसंचार विभागाला दिली आहे. कंपनीचे या धर्तीचे ८० लाख ग्राहक आहेत. पैकी ९० टक्के ग्राहक या जलद तंत्रज्ञानाकडे वळतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुजरात, महाराष्ट्रासह १२ परिमंडळात पहिल्या टप्प्यात ४जी सेवा सुरू करेल. तर पुढील दोन टप्प्यांत ती ऑगस्ट मध्यापर्यंत देशभरात सुरू होईल.
‘एअरसेल’चे विलीनीकरण
रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एअरसेल विलीनीकरण लवकरच पूर्ण होईल, असे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. उभय कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबतचा प्रस्तावित व्यवहार येत्या काही दिवसांतच पूर्ण केला जाईल, असेही रिलायन्स कम्युनिकेशन्सने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. गेल्याच महिन्यात याबाबतच्या प्रस्तावाला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. या विलीनीकरणानंतर रिलायन्सला २जी, ३जीबरोबरच ४जी सेवाही पुरविता येईल.