मुंबई : रिझव्र्ह बँकेने पुढील महिन्यातील २ ते ४ ऑगस्ट दरम्यान नियोजित पतधोरण समितीची बैठक प्रशासकीय अडचणीचे कारण देत एक दिवस पुढे ढकलली आहे. आता समितीची बैठक ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान आयोजण्यात आली आहे, असे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी स्पष्ट केले.
बँकेची २ ते ४ ऑगस्ट दरम्यान नियोजित बैठक प्रशासकीय अडचण पाहता पुढे ढकलत असल्याचे सांगण्यात आले आहे. चालू वर्षांत आतापर्यंत दोनदा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाल्याने त्यांच्या निधनाबाबत केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला तर राज्य सरकारने ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे रिझव्र्ह बँकेने ७ फेब्रुवारीला नियोजित बैठक एक दिवस पुढे ढकलली होती.
चालू आर्थिक वर्षांत मे आणि जून महिन्यात रिझव्र्ह बँकेने रेपोदरात अनुक्रमे ४० आणि ५० आधार बिंदूंची वाढ केली आहे. आता रेपोदर ४.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईच्या दरात सरलेल्या मे महिन्यात घट होऊन तो ७.०४ टक्के नोंदविण्यात आला आहे. मात्र अजूनही तो रिझव्र्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या वर असल्याने पुढील महिन्यात रिझव्र्ह बँकेकडून व्याजदरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.