भारतीय मोबाईल फोनच्या बाजारामध्ये २०१२-२०१३ या वर्षभरात १४.१७ टक्क्यांनी वाढ झाली. आजमितीस भारतीय मोबाईल फोनचा गेल्या वर्षभरातील खप ३५,९४६ कोटींवर पोहोचला आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतीय ग्राहकांचा कल स्मार्टफोन खरेदी करण्याकडे झुकल्यामुळे ही वाढ होणे शक्य झाले.
‘व्ही अँड डी १००’च्या १८व्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये २०११-२०१२ च्या तुलनेमध्ये २०१२-२०१३ या वर्षामध्ये भारतीय मोबाईल फोन बाजाराच्या उलाढालीमध्ये वाढ झाली. गेल्यावर्षी मोबाईल फोनची भारतीय बाजारातील एकूण उलाढाल ३१,३३० कोटी होती. या वर्षी भारतीय ग्राहकांमध्ये स्मार्टफोनच्या वाढलेल्या मागणीमुळे या बाजारातील एकूण उलाढाल ३५,९४६ कोटींवर पोहोचली असल्याचे ‘व्ही अँड डी १००’चा अहवाल सांगतो.
“मोबाईल फोन उत्पादनातील भारतीय कंपन्यांनी स्वस्त व सामान्यांना परवडणारे स्मार्टफोन बाजारात आणून धमाल उडवून दिली. मायक्रोमॅक्स, कार्बन, लाव्हा आणि झेन या स्थानिक मोबाईल कंपन्यांनी स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांच्या त्यावर उड्या पडल्या. ग्राहकांनादेखील वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेले मात्र खिशाला परवडणारे मोबाईल हवे असल्याचे सिद्ध झाले आहे. सामान्यातल्या सामान्य ग्राहकांना या कंपन्यांनी आपल्याकडे आकर्षित करण्यात य़श मिळवले.”,असे ‘व्ही अँड डी १००’ चे समुह संपादक इब्राहीम अहमद यांनी सांगितले.
‘व्ही अँड डी १००’ च्या पहिल्या १० फोनच्या यादीमध्ये भारतीय ‘मायक्रोमॅक्स’ने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या कंपनीचा मोबाईल बाजारातील एकूण वाटा ८.७ टक्के असून, वर्षभरातील एकूण कमाई ३,१३८ कोटी रुपये आहे.
‘कार्बन’ स्मार्टफोनच्या खपातदेखील सातत्य राहिले असून, २०१२-२०१३ या आर्थिक वर्षामध्ये ‘कार्बन’च्या खपामध्ये ७३.१ टक्क्यांनी वाढ होऊन कंपनीने २,२९७ कोटींच्या कमाईची नोंद केली.
स्मार्टफोनमधील सर्वात महागड्या ‘अँपल’ची या आर्थिक वर्षामध्ये भारतातील उलाढाल १,२९३ कोटींवर अडखळली.