सलग पाचव्या व्यवहारात घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने सोमवारी नव्या आठवडय़ाचा प्रारंभ २०,५०० च्या खाली येत केला. अपेक्षेपेक्षा चांगल्या रोजगार आकडेवारीमुळे अमेरिकेत अर्थसाहाय्य उपाययोजना माघारी घेतल्या जाण्याच्या धास्तीने मुंबई निर्देशांकात १७५.१९ अंश घसरण होत सेन्सेक्स २०,४९०.९६ वर बंद झाला.
भारताने ऑक्टोबरमध्ये वाढती निर्यात व घसरती आयात नोंदवूनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत प्रमुख भांडवली बाजारात घसरण घडवून आणली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.९५ अंश आपटीसह ६ हजारांवर, ६,०७८.८० पर्यंत येऊन ठेपला. बाजार आता महिन्याभराच्या किमान पातळीवर आला आहे.
नव्या सप्ताहाची घसरणीसह सुरुवात करणारा सेन्सेक्स दिवसभरात २०,४५३.१५ पर्यंत घसरला. दोन वर्षांतील सर्वोच्च निर्यातीच्या जोरावर तो २०,६७२.५३ पर्यंत पोहोचला खरा, मात्र दिवसअखेर त्याची घसरणच झाली. सेन्सेक्समधील २४ कंपनी समभागांचे मूल्य घसरले. त्यातही रिलायन्स इंडस्ट्रिज व टाटा मोटर्स यांचे स्थान वरचे होते.