नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना प्रमुख भांडवली बाजारात सोमवारी संमिश्र हालचाली टिपल्या गेल्या. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १६.०५ अंश घसरणीसह २२,३४३.४५ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी किरकोळ, ०.७० अंश वाढीने ६,६९५.०५ वर चढला.
१६ व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस असतानाच भांडवली बाजारात मात्र गुंतवणूकदारांनी व्यवहार करताना सावध पवित्रा अवलंबिला. मुंबई शेअर बाजारात सुरुवातीला मोठे, तब्बल १६० अंशांचे नुकसान सोसले गेले. या वेळी बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांची विक्री झाली.
सेन्सेक्समधील ही सलग तिसऱ्या व्यवहारातील घसरण होती. त्यामुळे त्याने २२,५०० या टप्प्यापासूनही आता माघार घेतली आहे. ताबा प्रक्रियेमुळे बाजारात औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी समभागांमध्ये थोडीशी अस्वस्थ हालचाल नोंदविली गेली. यात अर्थातच सन फार्मा, रॅनबॅक्सी चर्चेत राहिले. भांडवली बाजारांसह परकी चलन व सराफा बाजारात मंगळवारी रामनवमीनिमित्ताने व्यवहार होणार नाहीत. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी अवघ्या ३ पैशांनी घसरत ६०.११ वर आला. तर सराफा बाजारात दरांतील घसरण नोंदविली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex down 16 points to close at 22343 and nifty 6695 rose
First published on: 08-04-2014 at 12:26 IST