scorecardresearch

घसरण षटकार ; निरंतर विक्रीने ‘सेन्सेक्स’ नऊ महिन्यांच्या नीचांकाला

सेन्सेक्सची ही ३० जुलै २०२१ नंतरची पण नऊ महिन्यांपूर्वी मागे सोडलेली नीचांकी बंद पातळी आहे.

मुंबई : सप्ताहअखेरच्या सत्रात शेवटच्या तासाभरात नफावसुलीमुळे झालेल्या नुकसानीने सलग सहावे सत्र भांडवली प्रमुख निर्देशांकांनी नकारात्मक पातळीवर संपविले. देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढे आलेली निराशाजनक आकडेवारी आणि परकीय गुंतवणूकदारांकडून अखंडपणे सुरू असलेली विक्री यातून घसरणीच्या मालिकेने शुक्रवारी षटकार साधला.

चांगल्या वाढीसह सुरुवात करीत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दुपारच्या व्यवहारात ८००हून अधिक अंशांनी उसळला होता. परंतु मंदीवाल्यांनी पुन्हा जोर लावला आणि विक्रीच्या तीव्र दबावाखाली तो १३६.६९ अंश (०.२६ टक्के) घसरून ५२,७९३.६२ या पातळीवर दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा स्थिरावला. सेन्सेक्सची ही ३० जुलै २०२१ नंतरची पण नऊ महिन्यांपूर्वी मागे सोडलेली नीचांकी बंद पातळी आहे. याच धर्तीवर, व्यापक प्रतिनिधित्व असलेला निफ्टी निर्देशांक २५.८५ अंश (०.१६ टक्के) घसरून १५,७८२.१५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये स्टेट बँकेच्या समभागात घसरणीत सर्वात पुढे होता. स्थानावर होती, ३.७६ टक्क्यांनी घसरली, देशातील सर्वात मोठय़ा बँकेने चौथ्या तिमाहीच्या शुक्रवारी जाहीर केलेल्या वित्तीय निष्कर्षांनुसार, निव्वळ नफ्यात ४१ टक्क्यांची वाढ साधून तो ९,११४ कोटी रुपये नोंदविला. परंतु विश्लेषकांच्या अंदाजांची पूर्तता करण्यात बँक अपयशी ठरल्याने तिच्या समभागात पावणेचार टक्क्यांच्या घसरणीची प्रतिक्रिया उमटताना दिसून आली.

रेपो दर वाढीनंतर  १० टक्के वाताहत 

शुक्रवारची घसरण जमेस धरल्यास, साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स २,०४१.९६ अंशांनी अर्थात ३.७२ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी ६२९.१० अंशांनी (३.८३ टक्क्यांनी) घसरला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने ४ मे रोजी महागाईच्या भडक्याच्या भीतीतून अकस्मात रेपो दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर, दोन्ही निर्देशांकांत जवळपास १० टक्क्यांची तीव्र घसरण दिसून आली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex falls 136 points to 52793 and nifty declines 26 points zws