‘सेन्सेक्स’मध्ये शतकी भर

भारतातील दूरसंचार क्षेत्रातील घडामोडींच्या जोरावर एकूणच बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला.

निफ्टी ८,९५० पार पाच महिन्यांच्या उच्चांकावर!

सलग चौथ्या सत्रात तेजी कायम राखताना भांडवली बाजार मंगळवारी गेल्या पाच महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर नव्याने विराजमान झाले. भारतातील दूरसंचार क्षेत्रातील घडामोडींच्या जोरावर एकूणच बाजारात गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला.

१००.०१ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,७६१.५९ वर पोहोचला. तर २८.६५ अंश भर राखत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मंगळवारी ८,९०० वर ८,९५२.५० वर बंद झाला.

सेन्सेक्सने गेल्या सलग तीन व्यवहारांमध्ये ५०६.०२ अंश वाढ नोंदविली आहे. मुंबई निर्देशांकाचा यापूर्वीचा वरचा टप्पा २२ सप्टेंबर २०१६ रोजी २८,७७३.१३ होता.

मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २८ हजाराच्या वरच राहिला. सत्रातील त्याचा किमान स्तर २८,८०१ तर कमाल टप्पा २८,५९७.३३ असा राहिला.

सत्रअखेर ८,९०० पुढील वाटचाल कायम ठेवणाऱ्या निफ्टीनेही मंगळवारी गेल्या पाच महिन्यातील उच्चांकी टप्पा राखला. निफ्टी यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी ८,९५२.५० होता.

सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये अदानी पोर्ट्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी आदी सहभागी होते. अन्य एका खासगी बँकेबरोबरच्या विलीनीकरणाच्या चर्चेने अ‍ॅक्सिस बँकेचा समभाग ५ टक्क्यांपर्यंत वाढला.

चीनमधून आयात होणाऱ्या निवडक स्टील उत्पादनांवर आयात शुल्क वाढविल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. त्याचा परिणामजिंदाल स्टील, जिंदाल सॉ अ‍ॅण्ड पॉवर, महाराष्ट्र सिमलेस, टाटा स्टील आदींच्या समभागांमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यावर झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, वित्त, तेल व वायू, भांडवली वस्तू, पोलाद, वाहन निर्देशांक २.४४ टक्क्यांनी वाढले.

बीएसई मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५२ व ०.४६ टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्समध्ये घसरलेल्या समभागांमध्ये भारती एअरटेलसह टीसीएस, सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड आदींचा सहभाग राहिला.

दूरसंचार समभागांत घसरण

रिलायन्स जिओच्या घोषणासत्राने भांडवली बाजारात एकूणच दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या सूचिबद्ध समभागांमध्ये मंगळवारी कमालीचा उतार-चढाव अनुभवला गेला.

सेन्सेक्स वधारूनही घसरलेल्या समभागांमध्ये भारती एअरटेल अग्रस्थानी राहिला. तर एकूण दूरसंचार क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्वाधिक फरकाने आपटला.

  • भारती एअरटेल रु. ३६०.५५ ३ ३.३८%
  • आयडिया सेल्युलर रु. १०८.३० ३ ०.३७%
  • दूरसंचार निर्देशांक : ३ २.३५%

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex goes up