मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत भांडवली बाजारात ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि पायाभूत सुविधा कंपन्यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.

सकाळच्या सत्रात कमकुवत सुरुवातीनंतरही दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५७.४५ अंशांनी वधारून ५८,८०७.१३ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने ४७.१० अंशांची भर घातली आणि तो १७,५१६.८५ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये आयटीसीचा समभाग ४.६० टक्के तेजीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स, डॉ रेड्डीज आणि इन्फोसिसचे समभाग तेजीत होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.८० टक्क्यांपर्यंत वधारले.