युरोपातील अर्थवृद्धीच्या चिंतेने जगभरच्या भांडवली बाजारावर दाटलेल्या छायेचे सावट स्थानिक बाजारातही शुक्रवारी उमटले. गुरुवारच्या दमदार मुसंडीसह उंचावलेल्या भावावर नफावसुलीची संधीही साधली गेल्याने, प्रमुख निर्देशांकांमध्ये सव्वा टक्क्यांहून मोठी घसरण दिसून आली.
शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ३३९.९० अंशांनी घसरून २६,२९७.३८ वर स्थिरावला. तर ७९००ची पातळी कायम राखण्यासाठी गेले काही दिवस झगडत असलेल्या निफ्टीने दिवसअखेर १००.६० अंशांच्या उतरंडीसह ७,८५९.९५ या पातळीवर विश्राम घेतला. बाजारातील या पडझडीच्या प्रवाहाला केवळ e02इन्फोसिसच्या समभागाने खो घातला. दुसऱ्या तिमाहीतील चमकदार कामगिरीच्या जोरावर हा समभाग ६.६८ टक्क्यांनी उसळला.
रुपयात ३० पैशांची घसरण!
देशांतर्गत आयातदारांकडून अमेरिकी डॉलरची मागणी वाढणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरची सशक्तता या परिणामी शुक्रवारी रुपयाची डॉलरच्या तुलनेत ३० पैशांनी घसरण झाली. आता एका डॉलरसाठी ६१.३५ रुपये या स्तरावर विनिमय दर पोहचला आहे. या आधीच्या सलग चार दिवसांत रुपयाचा डॉलरच्या तुलनेत भाव वधारत आला होता. या चार दिवसांत डॉलरमागे ६२ रुपयांच्या पातळीपासून सावरत रुपया तब्बल ७० पैशांनी वधारला आहे.