जागतिक शेअर बाजारातील तेजीच्या जोरावर येथील भांडवली बाजारातही वर्षअखेरच्या टप्प्यात उत्साह संचारला आहे. गुरुवारच्या किरकोळ वाढीनंतर सेन्सेक्सने सप्ताहअखेर एकदम शतकी झेप घेतली. ११८.९९ अंश वाढीने मुंबई निर्देशांक आता तीन आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला. २१,१९३.५८ अशांवर स्थिरावताना तो १० डिसेंबरनंतरच्या सर्वोच्च टप्प्यावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३४.९० अंश वधारणेसह ६,३१३.८० पर्यंत गेला आहे. निफ्टीचा दिवसभराचा वरचा स्तर ६,३२४.९० नोंदला गेला.
महिन्यातील वायदा पूर्तीची अखेर करताना सेन्सेक्सने गुरुवारी ४२ अंशांची वाढ राखत २१ हजारापुढील टप्पा कायम राखला होता. शुक्रवारची सुरुवात शेअर बाजाराने तेजीसह करत २१,२०० पर्यंत मजल मारली. ख्रिसमसच्या सुटीनंतर सुरू झालेले जागतिक शेअर बाजारातील व्यवहार तेजीत आहेत. त्याचे चित्र येथेही उमटून सेन्सेक्स दिवसभरात वाढ राखत होता. बँक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस यांचे समभाग मूल्य वधारले. इन्फोसिसच्या समभाग मूल्याने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील पहिली माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएस सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वधारणारा नोंदविणारा समभाग ठरला. एकूण माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक १.७१ टक्क्यांनी उंचावला. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक या वित्त क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली. सेन्सेक्सच्या वधारणेत आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अॅण्ड टुब्रो, सन फार्मा, सेसा स्टरलाईट यांनीही वाटा राखला. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपनी समभाग वधारले. १२ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ नोंदली गेली.
सलग दुसऱ्या आठवडय़ात सेन्सेक्समध्ये वाढ नोंदली गेली आहे. सेन्सेक्सने शुक्रवारी राखलेला स्तर हा १० डिसेंबरच्या २१,२५५.२६ नंतरचा राहिला आहे.
रुपयाचाही हातभार
भांडवली बाजाराच्या तेजीला हातभार लावणारा रुपया शुक्रवारी ३१ पैशांनी उंचावत ६१.८५ वर गेला. भारतीय चलनाने अमेरिकन डॉलरसमोर गुरुवारी ३७ पैशांची कमकुवता नोंदविली होती. त्यावेळी तो ६२.१६ पर्यंत घसरला होता. २५ डिसेंबरपूर्वी सलग तीन दिवसातील तेजीने रुपया ६१.७९ या वरच्या टप्प्यावर होता. या दरम्यान त्यातील वाढ २५ पैशांची राहिली. शुक्रवारच्या व्यवहारात चलन ६१.८३ पर्यंत उंचावले होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2013 रोजी प्रकाशित
सेन्सेक्स तेजीत
जागतिक शेअर बाजारातील तेजीच्या जोरावर येथील भांडवली बाजारातही वर्षअखेरच्या टप्प्यात उत्साह संचारला आहे. गुरुवारच्या किरकोळ वाढीनंतर

First published on: 28-12-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex rises 119 points it banking stocks shine