सेन्सेक्स २५ हजाराखाली; निफ्टीने ७,६ ०० स्तरही सोडला
चीनमधील विकास दर व परकी राखीव गंगाजळीच्या चिंताजनक स्थितीने डोके वर काढताना समस्त भांडवली बाजारांना सप्ताहारंभीच घसरण नोंदविण्यास भाग पाडले. भारतात कमी मान्सून आणि घसरत्या रुपयाच्या धास्तीचा विपरित परिणाम सेन्सेक्स तसेच निफ्टीवर आठवडय़ातील पहिल्याच सत्रात झाला.
एकाच व्यवहारात तब्बल त्रिशतकी आपटी नोंदवित मुंबई निर्देशांक २५ हजाराच्याही खाली आला. सेन्सेक्सचा हा
गेल्या १५ महिन्यातील तळ राखला गेला. तर जवळपास शतकी घसरण अनुभवत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,६०० चा स्तरही सोडला. निफ्टीचा १३ महिन्यातील तळ होता.
चीनमधील सकल राष्ट्रीय उत्पादनाबाबत कमी, ७.३ टक्के अंदाज व्यक्त होतानाच जगातील दुसरी मोठय़ा अर्थव्यवस्थेतील परकी राखीव गंगाजळीही मासिक तुलनेत सर्वात मोठी ओहोटी नोंदविणारी ठरली. ऑगस्टमधील या देशाची गंगाजळी ९३.९ अब्ज डॉलरने कमी होत ३.५५ लाख कोटी डॉलरवर येऊन ठेपली आहे.
भारतात मान्सून काढता पाय घेत असल्याचे सावट असतानाच परकी चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत रुपयाने व्यवहारात ६६.८२ पर्यंत घसरण नोंदविल्याची चिंताही गुंतवणूकदारांना सप्ताहारंभीच्या व्यवहारात सताऊ लागली. अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीकडे लक्ष लागले असतानाच बाजारातील घसरणीने अधिक अस्वस्थता नोंदविली.
परिणामी व्यवहारऋत २५,३८७.३२ पर्यंत उंचावणारा सेन्सेक्स दिवसअखेर ३०८.०९ अंशांने खाली येत २४,८९३.८१ वर स्थिरावला. १.२२ टक्के आपटीचा निर्देशांकाचा हा ४ जून २०१४ नंतरचा किमान प्रवास होता. ९६.२५ अंश घसरणीसह ७,५५८.८० पर्यंत येऊन ठेपलेल्या निफ्टीतही १.२६ टक्के घसरण झाली. यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १५ जुलै २०१५ नंतरच्या तळात येऊन विसावला.
मुंबई निर्देशांकातील केवळ चार समभाग तेजीत राहिले. सेन्सेक्समधील अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, ल्युपिन, भेल, वेदांता यांच्या समभागांमध्ये अधिक घसरण नोंदली गेली. तर आरोग्यनिगा, पोलाद, बँक, ऊर्जा, भांडवली वस्तू निर्देशांक घसरणीत आघाडीवर राहिले.
चीनमधील शांघाय २.५२, हँग सँग १.२३ टक्क्य़ांनी घसरला होता.
निर्देशांकातील मोदी लाट अखेर ओसरली..
२५ हजाराखाली मुंबई शेअर बाजाराचा प्रवास हा मे २०१४ नंतरचा किमान ठरला आहे. या कालावधीत केंद्रात मोदी सरकारच्या सत्तारुढतेवर बाजार वरच्या टप्प्यावर विराजमान होता. मोदी सरकारच्या सत्तास्थापनेला सव्वा वर्ष होत असतानाचा भांडवली बाजाराने नोंदविलेला सोमवारचा प्रवास तमाम बाजार तज्ज्ञांना त्यांचे अंदाज आणखी खाली नोंदविण्यास भाग पडला.
‘बाजारात अस्वस्थता कायम राहिल’
भांडवली बाजारातील सध्याच्या वातावरणानंतर एकूण सप्टेंबर तसेच नोव्हेंबरमध्येही अस्वस्थता राहिल, असे भाकित बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने वर्तविले आहे. यासाठी अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची संभाव्य व्याजदर वाढ तसेच भारतात – बिहारमधील विधानसभेचे निकाल, कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष हे दाखले देण्यात आले आहेत. व्याजदर कपातीबाबत मात्र आशा व्यक्त केली आहे.
रुपया दोन वर्षांच्या गाळात
डॉलरच्या तुलनेत रुपयातील अस्वस्थता आठवडय़ाच्या सुरुवातीलाच अधिक विस्तारली. ३६ पैशांनी घसरत रुपया सोमवारी ६६.८२ पर्यंत खाली आला. चलनाचा हा गेल्या दोन वर्षांतील तळ राहिला. सोमवारच्या व्यवहाराची ६६.६० अशी कमकुवत टप्प्यावरच सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६६.८६ पर्यंत घसरला. दिवसअखेर त्यात शुक्रवारच्या तुलनेत ०.५४ टक्के घसरण झाली. चलनाचा सोमवारअखेरचा प्रवास हा ४ सप्टेंबर २०१३ नंतरचा किमान प्रवास राहिला. यावेळी तो ६७.०७ वर होता. गेल्या आठवडय़ात सलग तीन व्यवहारात भारतीय चलन ६३ पैशांनी कमकुवत बनले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex slips below 25000 to 15 month low amid rupee tumble
First published on: 08-09-2015 at 07:57 IST