शेवटच्या अध्र्या तासाच्या व्यवहारांत विक्रीच्या वाढलेल्या जोरामुळे शेअर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकाने शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी घसरण दाखविली. सकाळपासून सेन्सेक्समध्ये कालच्या तुलनेत जवळपास शतकी वाढ सांभाळून ठेवणाऱ्या बाजारात दुपारी तीननंतर नवी दिल्लीत प्रतिकूल राजकीय घडामोडी आणि युरोपिय बाजारांचा नकारात्मक कल पाहता तीव्र स्वरूपाचा उतार दिसून आला. युरोझोन कर्ज अरिष्टाचे गहिरे रूप तसेच देशाचे चलन रुपयाने डॉलरच्या तुलनेत ५५ पुढे घेतलेली बुडीही गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरविली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसअखेर ५,५७४ वर स्थिरावताना, कालच्या तुलनेत ५६.९५ अंशांनी घसरला. निफ्टीमधील चालू वर्षांतील २६ जुलैनंतरची ही दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. त्या उलट सेन्सेक्स शुक्रवार दिवसअखेर १८,३०९.३७ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १६२ अंशांची घसरण झाली. ्रप्रमुख निर्देशांकांच्या घसरणीनंतरही बहरात असलेल्या बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाची आज घसरगुंडी उडालेली दिसून आली. उद्योगक्षेत्रवार निर्देशांकात केवळ बीएसई आयटी व बीएसई टेक निर्देशांकानी प्रत्येकी ०.४६ टक्के अशी माफक कमाई केली. बीएसई रिअ‍ॅल्टी निर्देशांक तर तब्बल ३.३६ टक्क्यांनी घसरला.
नवी दिल्लीत हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी यूपीए आघाडीचा आधारस्तंभ असलेल्या समाजवादी पार्टीने अकस्मात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करण्याच्या पवित्र्याबाबत वेगवेगळे राजकीय तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा थेट विदेशी गुंतवणुकीला विरोधाच्या निग्रही पवित्र्यानेही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमधील साशंकतेला आज बळ दिले. महागाई दराबाबत चिंता व्यक्त करीत रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदराबाबत नरमाईची फेटाळून लावलेली शक्यताही शेअर बाजाराच्या भावनेला इजा पोहचविणारी ठरली.
अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी चालू आर्थिक वर्षांच्या आगामी तिसऱ्या व चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था वेग पकडेल अशा आश्वासक विधानांचेही बाजारात सकारात्मक पडसाद आज दिसून आले नाहीत. अंदाजित आर्थिक विकासदर गाठला जाण्याबरोबरच, वित्तीय तुटीलाही ५.३ टक्क्यांच्या मर्यादेत राखण्यास सरकारला यश येईल असा दृढ विश्वासही चिदम्बरम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पण त्यांच्या या विधानांचा बाजारावर फारसा परिणाम जाणवला नाही.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रमुख  निर्देशांक
सेन्सेक्स                          ०.८८%
निफ्टी                              १.०१%
बीएसई मिडकॅप               ०.८९%
बीएसई स्मॉलकॅप            १.१३%
सीएनएक्स मिडकॅप         १.०६%
निफ्टी ज्युनियर               १.०९%
सीएनएक्स ५००               १.०२%

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex tumbled 162 points to end at nearly two month low
First published on: 17-11-2012 at 12:08 IST