मौल्यवान धातूच्या जागतिक पातळीवरच्या वधारत्या किंमती लक्षात घेऊन सरकारने सोने तसेच चांदीवरील आयात शुल्क वाढविले आहे. यानुसार १० ग्रॅम सोन्यावर आता ५६१ डॉलर तर एक किलो चांदीवर १,०५८ डॉलर आयात शुल्क लागू होईल.
सोने-चांदीच्या धातूंवरील मूल्य शुल्काचा दर पंधरवडय़ाला आढावा घेतला जातो. सीमाशुल्काच्या प्रमाणात हे शुल्क मौल्यवान धातूंच्या आयातीवर लागू केले जाते. सण-समासंभाचा कालावधी सुरू होण्याच्या मोसमात, ऑक्टोबरमध्ये १० ग्रॅम वजनाच्या सोन्यावरील आयात शुल्क ५५६ डॉलर होते. तर चांदीसाठी ते एक किलोमागे १,०३९ डॉलर होते. नव्या वाढीव शुल्क मूल्याचे आदेश केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क मंडळाने गुरुवारी जारी केले. मौल्यवान धातूंमध्ये जागतिक स्तरावर मोठे फेरबदल झाले की सोने तसेच चांदीच्या आयात शुल्कांची रचनाही बदलण्यात येते. लंडनच्या बाजारात सध्या सोन्याच्या किंमती प्रती औन्स १,७२४.८० डॉलर (२८.३५ ग्रॅम) तर चांदीचे दर प्रती औन्स ३२.६४ डॉलर आहेत.भारत हा सर्वात मोठा सोने आयातदार देश ओळखला जातो. २०११ मध्ये देशाने १,०३७ टन सोने मागणी नोंदविली होती. पैकी ९६७ टन सोने आयात करण्यात आले होते.