एप्रिलमध्ये महागाई दराने विसावा घेतल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँक येत्या महिन्यातील पतधोरणात व्याजदर कपात करणार का, यावर चर्चा सुरू असतानाच खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने सोमवारी मर्यादित कालावधीसाठी गृह कर्ज व्याजदर अवघ्या ०.१० टक्क्याने कमी केले. बँकेचे ७५ लाख रुपयांचे बदलते (फ्लोटिंग) गृह कर्ज व्याजदर आता स्टेट बँकेच्या दरांशी समकक्ष असतील. बँकेचे हे दर १५ मे ते ३० जून या कालावधीसाठी असतील. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचा नवा दर वार्षिक १०.१५ टक्के असेल. तर महिला कर्जदारांसाठीचा दर १०.१० टक्के असेल. बँकेने एक व दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीसाठी स्थिर व्याजदर देऊ करणारी योजनाही सादर केली आहे. यानुसार ७५ लाख रुपयांसाठीच्या कर्जावर पहिल्या वर्षी १०.२५ टक्के व पुढील वर्षांत आधारभूत दराच्या पाव टक्के अधिक दर आकारला जाईल.