नव्या उच्चांकासह आर्थिक वर्षांची अखेर करणाऱ्या शेअर बाजारात प्राथमिक भागविक्रीच्या माध्यमातून कंपन्यांनी १,२०५ कोटी रुपये २०१३-१४ मध्ये उभारले आहेत. या आर्थिक वर्षांत खासगी क्षेत्रातील जस्ट डायलची ९१९ कोटी रुपयांचीच सर्वात मोठी आणि यशस्वी भागविक्री प्रक्रिया ठरली. तर सार्वजनिक क्षेत्रात गेल्या दोन वर्षांतील शेवटची प्राथमिक भागविक्री प्रक्रिया एनबीसीसीची मार्च २०१२ मध्ये राहिली आहे.
‘प्राइम डाटाबेस’च्या अभ्यासानुसार, २०१२-१३ मध्ये अवघ्या नऊ कंपन्यांद्वारे उभारली गेलेली रक्कम ६,२८९ कोटी रुपये होती. या बाजारपेठेत नवे आर्थिक वर्ष प्रगतीचे असेल, असा विश्वास ‘प्राइम डाटाबेस’चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वी हल्दिया यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात निवडणुकीनंतर येणारे स्थिर सरकार यादृष्टीने गुंतवणूकदारांच्या भावनेला हात घालेल, असेही हल्दिया यांनी म्हटले आहे. नव्या भागविक्री प्रक्रियेत राष्ट्रीय इस्पात, महानगर गॅस, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, कोचीन शिपयार्डसारख्या कंपन्या सहभागी होतील, असेही ते म्हणाले. गेली सलग तीन वर्षे या बाजारांसाठी मंदीची गेली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या या माध्यमातून निधी उभारण्याची घोषणा करणाऱ्यांची संख्या ९०० हून अधिक आहे. मात्र त्यापैकी केवळ १४ कंपन्या २,७९६ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी बाजार नियामक सेबीची परवानगीही मागितली आहे. याशिवाय चार कंपन्यांमार्फत २,७०० कोटी रुपये उभारण्यासाठी मसूदा प्रस्ताव (डीआरएचपी) दाखल केला असून, सेबीच्या मान्यतेची त्यांना प्रतीक्षा आहे.