मुंबई : भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने गत सलग तीन सत्रांमध्ये सुरू असलेली झड संपुष्टात आणत, सप्ताहरंभी व्यवहारात बँकिंग, वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी उत्पादने व वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या खरेदीच्या बळावर त्रिशतकी झेप घेतली.

जागतिक पातळीवरील, विशेषत: आशियातील प्रमुख भांडवली बाजारातील नकारात्मक कल पाहता, स्थानिक बाजारात सोमवारच्या व्यवहाराची सुरुवात घसरणीनेच झाली होती. तथापि प्रारंभिक घसरणीतून प्रमुख निर्देशांक लवकरच सावरले. परिणामी ३००.४४ अंश कमाई करून सेन्सेक्स दिवसअखेरीस ५९,१४१.२३ अंशांवर स्थिरावला. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक ९१.४० अंशांची वाढ साधून दिवसअखेरीस १७,६२२.२५ वर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांनी मूल्यवाढ साधली.  अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडच्या नियोजित घोषणेची वेळ (२१ सप्टेंबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री) जसजशी जवळ येत आहे, तसतसे जागतिक बाजारांना अस्थिरतेने घेरल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील नवीनतम चलनवाढीचे प्रमाण हे अंदाजापेक्षा वरच आहे. एकंदर कठोर धोरणाची कास म्हणजेच आणखी एक मोठी व्याजदर वाढ सुचविणारा कल आहे. ज्याचा परिणाम म्हणून भारतातून विदेशी गुंतवणुकदारांचे पैसे काढले जाणे स्वाभाविकपणे दिसून येते. तथापि, हा कल अल्पकाळ टिकेल. कारण चलनवाढीचा ओसरणारा कल पाहता, वर्षअखेरीस धोरणात्मक स्थिरता येईल, असे जिओजित फायनान्शियलचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.