मुंबई : भांडवली बाजारात गुरुवारी निर्देशांकांनी उच्चांकी स्तरावर सत्रांतील व्यवहारांना निरोप दिला. माहिती-तंत्रज्ञान आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मिळालेले खरेदीचे पाठबळ असे वैशिष्टय़ राहिलेल्या व्यवहारांत सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सकारात्मक प्रवाह कायम राखत, मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक अर्थात सेन्सेक्सने ३१८.०५ अंशांची नव्याने भर घालत, ५४,८४३.९८ असा सार्वकालिक उच्चांकी बंद स्तर गुरुवारी नोंदविला. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने ८२.१५ अंशांच्या कमाईसह, १६,३२५.१५ अशी अभूतपूर्व पातळी दिवसअखेरीस गाठली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी बळावलेले रुपयांचे विनिमय मूल्यही बाजारातील खरेदी उत्साह दुणावणारे ठरले.
बाजारातील गुरुवारच्या व्यवहारांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गेले काही दिवस सपाटून मार खात असलेल्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांना चांगली मागणी मिळाली. या वर्गवारीतील अनेक समभागांच्या मूल्यात उलटफेर घडून, त्यांनी खरेदीच्या बळा मोठी भाव उसळी घेतलेली दिसून आली. सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांतील वाढ ही अनुक्रमे ०.५८ टक्के ०.२६ टक्के असताना, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी तुलनेत दुपटीहून अधिक म्हणजे १ ते २ टक्क्य़ांची वाढ दाखविली.
खरेदीचे स्वरूपही एकंदरीत सर्वव्यापी होते. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभागांचे भाव वधारले. औषधी उद्योगाच्या निर्देशांकाचा अपवाद केल्यास, सर्वच उद्योग क्षेत्रवार निर्देशांकांची कामगिरी सकारात्मक राहिली. त्यातही माहिती-तंत्रज्ञान, ऊर्जा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थावर मालमत्ता आणि भांडवली वस्तू या निर्देशांकांनी एक ते अडीच टक्क्य़ांपर्यंत वाढ दाखविली.