गुरुवारच्या सुट्टीमुळे चार दिवसांचे व्यवहार झालेल्या आठवडय़ातील तेजीची कायम राहिलेली झुळूक सेन्सेक्सला २१ हजार पल्याड नेऊन बसविणारी ठरली.
जरी तो संस्थागत गुंतवणूकदारपुरता मर्यादित असला तरी बाजारात खरेदीला जोर चढला आहे. विदेशी वित्तसंस्था- एफआयआयची डेरिव्हेटिव्हज्पेक्षा रोख बाजारातील खरेदी उत्साहदायी निश्चितच आहे. शिवाय मिडकॅपमधील त्यांच्या आकर्षणानेही उसंत घेतल्याचे दिसून येत नाही. मिडकॅप-स्मॉलकॅप कंपन्यांची आर्थिक कामगिरी ही लार्जकॅप किंवा बडय़ा कंपन्यांपेक्षा फारशी वेगळी नाही. किंबहुना त्यांच्या मिळकत व नफ्याचे प्रमाणही बडय़ा कंपन्यांच्या तुलनेत कमीच आहे. तरी चाणाक्ष गुंतवणूकदाराच्या नजरा या विद्यमान घटनाक्रमापेक्षा भविष्याकडे लागलेल्या असाव्यात असा एक प्रधान संकेत आहे. म्हणूनच एफआयआयकडून ताज्या बाजारस्थितीत होत असलेल्या या गुंतवणुका लक्षवेधीच म्हणायला हव्यात. एका विश्वासपात्र विश्लेषणानुसार, १०४ लार्जकॅप आणि ९० मिडकॅप कंपन्यांच्या तिमाही कामगिरीच्या केलेल्या अभ्यासात, लार्जकॅप कंपन्यांच्या निव्वळ नफ्याच्या प्रमाणात गेल्या वर्षांच्या तुलनेत ०.४ टक्क्यांनी घट झाली आहे, तर हीच घट मिडकॅप कंपन्यांच्या बाबतीत १.१६ टक्क्यांनी घटला आहे. मिडकॅप कंपन्यांची एकूण उत्पन्नात वर्षांगणिक २४ टक्क्यांची तर लार्जकॅप कंपन्यांच्या मिळकतीत सरासरी १० टक्क्यांची घट आढळली आहे.
लार्जकॅप कंपन्यांमध्ये तरी खरेदीचा जोर हा आयटी आणि औषधी कंपन्यांमध्ये सर्वाधिक आहे. या उद्योगक्षेत्रातील बहुतांश कंपन्यांचे भाव आता त्यांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहेत. इतके हे खरेदीचे केंद्रीकरण अंगावर काटा आणणारे जरूरच आहे. आता याच क्षेत्रातील मिडकॅप-आयटी आणि फार्मा समभागांकडे खरेदीचा होरा वळलेला दिसतो. हॉटेल समभागांमधील तेजी ही येत्या काळातील शालेय सुट्टय़ा आणि त्यानिमित्ताने सैरसपाटय़ाला जाणाऱ्यांच्या वाढलेल्या बुकिंग्जचा प्रत्यय म्हणता येईल. सरलेल्या आठवडय़ात त्या परिणामी इंडियन हॉटेल्स, ईआयएच, हॉटेल लीला, आयटीसी या समभागांमध्ये वाढ दिसून आली. अदानी समूहातील समभागही वरच्या दिशेने मुसंडीचे संकेत देत आहेत. निवडणुकांच्या निकालांसंबंधाने निर्माण होत असलेल्या ‘मोदी इफेक्ट’चा हा प्रत्यय ठरावा. पण निवडणुका जवळ येतील तस तसे बाजारातील अस्थिरतेलाही बळ मिळेल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या चढ-उताराच्या शक्यता लक्षात घेऊनच सावधपणे खरेदी करावी.

शिफारस..
गेल्या आठवडय़ात या स्तंभात ४९४ रु. भावावर सुचविलेल्या टाटा एलेक्सीने अपेक्षित कमाल केली. खरे तर दीघरेद्देशी गुंतवणूक म्हणून हा समभाग सुचविला होता पण त्याने आठवडय़ाभरात तब्बल १८ टक्क्यांची कमाई करून दाखविली. शुक्रवारची सप्ताहअखेर तर तब्बल १३ टक्क्यांच्या उडीने करीत त्याने ५८६ वर मजल मारली. आगामी निवडणूकमय अनिश्चित वातावरणात मिड-कॅप आयटी समभागांमध्ये निवांतता शोधण्याचा हा बाजारात प्रयत्न आहे. म्हणूनच टाटा एलेक्सीप्रमाणे सोनाटा सॉफ्टवेअरकडेही खरेदीसाठी लक्ष ठेवता येईल.