जागतिक भयलाटेत

अमेरिकी महागाईचे रौद्ररूप आणि ‘फेड’च्या संभाव्य दरवाढीने घबराट 

 मुंबई:  अमेरिकेतील महागाई दराचा पारा चढलेला असून, जानेवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार तो ४० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. परिणामी तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून आक्रमकपणे व्याजदरात वाढ केली जाण्याच्या भीतीचे जगभरातील गुंतवणूकदारांतील वातावरणाचे देशांतर्गत भांडवली बाजारावर शुक्रवारी विपरीत पडसाद उमटले.

जागतिक पातळीवर प्रमुख भांडवली बाजारात नव्याने आलेल्या समभाग विक्रीच्या भयलाटेचे स्थानिक बाजारावर स्पष्ट सावट शुक्रवारी दिसले. विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये सव्वा टक्क्यांहून मोठी घसरण झाली. सप्ताहाअखेरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७७३.११ अंशांच्या म्हणजेच १.३१ टक्क्यांच्या घसरणीसह ५८,१५२.९२ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २३१.१० अंश गमावले आणि तो १७,३७४.७५ पातळीवर स्थिरावला.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची अव्याहतपणे निधीचे निर्गमन सुरू असून, शुक्रवारच्या व्यवहारात त्यांच्याकडून समभाग विक्रीचा जोरदार मारा सुरू होता.  अमेरिकेत वार्षिक आधारावर महागाई दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी वाढत्या महागाईच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफावसुलीला प्राधान्य दिले. देशांतर्गत पातळीवर माहिती तंत्रज्ञान, गृहनिर्माण आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांना सर्वाधिक फटका बसला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदले. 

रुपयांत चार दिवसांत ६७ पैसे घसरण 

मुंबई: शुक्रवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी रोडावत ७५.३६ पर्यंत गडगडला. या रूपात चलनाने सलग चौथ्या सत्रात घसरण कायम राखली असून, त्याचे विनिमय मूल्य चार दिवसांत ६७ पैशांनी रोडावले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भांडवली बाजारातील मोठय़ा आपटीचा परिणाम परकी चलन विनिमय मंचावरही शुक्रवारी जाणवला. रुपया यापूर्वी गुरुवारच्या सत्रात ७५.१५ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला होता. जगातील भांडवली बाजारातील घसरगुंडीला साथ देत येथील सेन्सेक्स-निफ्टीने गुरुवारी सव्वा टक्क्यांहून मोठय़ा घसरणीचा प्रत्यय दिला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी समभागांच्या विक्रीचे धोरण त्यासाठी कारणीभूत ठरले. गुंतवणूक माघारी नेणाऱ्या या परदेशी संस्थांकडून डॉलरची मागणी वाढून रुपयाच्या मूल्यावर ताण निर्माण झाला आहे. ७५.४० या पातळीवर व्यवहाराची सुरुवात करणारा रुपया सत्रादरम्यान ७५.४६ पर्यंत घरंगळला होता, तर दिवसभरात त्याने ७५.२७ रुपये ही उच्चांकी पातळी गाठली.