भारतीय भांडवली बाजाराचा जगभरात वाढत्या दबदब्याचा प्रत्यय म्हणजे निफ्टी निर्देशांकावर आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंडाचे (ईटीएफ) व्यवहार आता तैवान शेअर बाजारात सुरू झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.
तैवानस्थित फ्युबन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे तीन ईटीएफ – फ्युबन निफ्टी ईटीएफ, फ्युबन निफ्टी २ एक्स लीव्हरेज्ड इंडेक्स ईटीएफ आणि फ्युबन निफ्टी-१ इन्व्हर्स इंडेक्स ईटीएफ अशा तीन योजना तेथे सुरू केल्या आहेत. या तीन निर्देशांकांची रचना एनएसईची उपकंपनी इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अँड प्रॉडक्ट्स लि. या कंपनीनेच केली आहे. या ईटीएफ योजनांतून तेथील गुंतवणूकदारांना आता अल्प खर्चात भारतीय बाजाराच्या प्रगतीचा वेध घेणारी गुंतवणूक करता येईल. तैवानमधील सूचिबद्धतेसह आता निफ्टी निर्देशांकांवर आधारित ईटीएफमध्ये गुंतवणुकीची संधी विविध १९ जागतिक बाजारांत उपलब्ध झाली आहे.