आघाडीची माहिती-तंत्रज्ञान सेवा कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस’ने फ्रान्समधील अल्टी एस. ए. या कंपनीचे १०० टक्के संपादन केल्याची मंगळवारी घोषणा केली. ७५० लाख युरो (साधारण ५३० कोटी रुपये) मोबदल्यात संपूर्ण रोखीने हा व्यवहार झाला असून, यातून भारतातील सर्वात मोठय़ा सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार असलेल्या टीसीएसला युरोपातील फ्रान्स, बेल्जियम, स्वित्र्झलड या देशांमधील पाया आणखी विस्तारता येईल.
वित्तीय सेवाक्षेत्र, निर्मिती आणि संलग्न सेवांसाठी बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सेवा प्रदान करणारी अल्टी ही फ्रान्समधील अग्रेसर कंपनी असून २०१२ सालात तिने १२६ दशलक्ष युरो (जवळपास ८९५ कोटी रुपये) इतके महसुली उत्पन्न कमावले. फ्रान्स, बेल्जियम व स्वित्र्झलड या देशांमध्ये कंपनीचे १२०० इतके मनुष्यबळ भांडवल आहे. तर टीसीएससाठी उत्तर  अमेरिकेनंतर युरोपीय क्षेत्रातील फ्रान्स ही तिसरी महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे कंपनीचे मुख्याधिकारी एन. चंद्रशेखरन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले. अल्टीवर ताबा मिळवून या बाजारपेठेतील टीसीएसच्या दीघरेद्देशी व धोरणात्मक अस्तित्वाला आणखी बळकटी मिळेल.
टीसीएस (बंद भाव)  रु. १,४९७१.१%
बीएसई आयटी निर्देशांक       २%
  युरोपात स्वस्त अधिग्रहणांवर भर
युरोपात स्वस्तात प्रस्थापित कंपन्या व त्यांचे व्यवसाय संपादित करून भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या युरोपीय देशांमधील पसारा वाढविण्याबरोबरच, उत्तर अमेरिकेनंतर ब्रिटनवरील भिस्त कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारतातील सॉफ्टवेअर सेवा अग्रणी इन्फोसिसने झुरिकस्थित लोडेस्टोन होल्डिंग या कंपनीचे अधिग्रहण केले. इन्फोसिसने हा सौदा ३३ कोटी स्विस फ्रँक्स (जवळपास १९०० कोटी रुपये) या मोबदल्यात केला होता. अमेरिकेनंतर आता युरोपातील कंपन्यांचाही आयटीविषयक कामे ही भारतातील सेवाकेंद्रातून पूर्ण करून घेण्याकडे कल वाढला आहे. असे केल्याने खर्चात जवळपास ७० टक्क्यांची बचत त्यांना साध्य करता येते.