देशातील सर्वात मोठा पोलाद प्रकल्पो २०२५ पर्यंत उत्पादनक्षमतेत पाच पट वाढ
जमशेदपूरनंतर टाटा स्टील या जागतिक पोलाद निर्मिती कंपनीच्या देशातील एकाच ठिकाणी उभ्या राहिलेल्या सर्वात मोठय़ा व अत्याधुनिक अशा कलिंगानगर (ओडिशा) येथील पोलाद निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे त्या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
प्रति वर्ष ६ मेट्रिक टन क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर २५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. २०२५ सालापर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन, उत्पादन क्षमताही पाच पटींनी वाढून वार्षिक १६ मेट्रिक टनावर जाईल, तर एकूण गुंतवणूक १ लाख कोटी रुपयांहून अधिक होईल. सध्या ३,००० लोकांना थेट रोजगाराची संधी मिळवून देणारा प्रकल्प २०२५ पर्यंत २२,००० लोकांसाठी नोकरीदाता बनेल, असा विश्वास पटनाईक यांनी यासमयी बोलताना व्यक्त केला.
टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन या प्रसंगी उपस्थित होते. सध्याच्या घडीला या प्रकल्पासाठी आवश्यक लोह खनिज हे तेथील जोडा खाणीतून उपलब्ध होईल.
टाटा स्टीलने खांदाबंध या आणखी एका खाणीच्या विकासासाठी २,३०० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे.
प्रकल्पाच्या क्षमतेत जसजसा विस्तार होईल, तसतसे म्हणजे २०१७ ते २०२० यादरम्यान या खाणीतून लोह खनिज पुरविले जाईल, असे सायरस मिस्त्री यांनी सांगितले. या महाकाय प्रकल्पासाठी राज्य सरकारने कंपनीला एकूण ३,४७० एकर जमीन मिळवून दिली आहे.