मुंबई : महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षेनुसार रेपो दरात शुक्रवारी थेट अर्धा टक्का वाढ केली. त्यामुळे तो सध्याच्या ५.४० टक्क्यांवरून ५.९० टक्क्यांवर गेला. गेल्या तीन वर्षांतील ही उच्चांकी वाढ आहे. रपो दरातील वाढीमुळे कर्जदारांवरील मासिक हप्तय़ांचा बोजा आणखी जड होणार आहे. गेल्या सहा महिन्यांत चौथ्यांदा झालेल्या या दरवाढीमुळे घर, वाहन आणि शैक्षणिक कर्जाचे व्याजदर वाढणार असून पर्यायाने मासिक हप्तय़ांतही वाढ होणार आहे. एकीकडे महागाईची झळ आणखी काही काळ सोसावीच लागेल असेही रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे, तर दुसरीकडे कर्जाच्या मासिक हप्तय़ात वाढीचा बोजाही सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयानंतर लगेचच गृहकर्ज क्षेत्रातील आघाडीच्या ‘एचडीएफसी लिमिटेड’ने गृहकर्जावरील व्याजदरात थेट अर्धा टक्क्याची वाढ शुक्रवारी जाहीर केली. नवे व्याजदर शनिवार १ ऑक्टोबरपासून नव्या आणि विद्यमान कर्जदारांनाही लागू होतील.

मुदत ठेवींवरील लाभ 

बँकांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींवर ग्राहकांना आता अधिक व्याज मिळेल, ही बाब दिलासादायक आहे. खासगी क्षेत्रातील अग्रणी ‘आयसीआयसीआय’ बँकेने विविध मुदतठेवींवर देय व्याजदरात पाव टक्क्याची वाढ केली आहे. सरकारने निवडक अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या लाभात आज, शनिवार १ ऑक्टोबरपासून ०.३० टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे बँका आणि पोस्टातील ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.  रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय पाच विरुद्ध एक अशा बहुमताने घेतला. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत मेपासून आतापर्यंत एकूण १९० आधार बिंदूंची दरवाढ केली आहे. आधी तीनदा केलेली दरवाढ ही ‘एमपीसी’च्या सहाही सदस्यांच्या पूर्ण सहमतीने झाली होती. रेपो दरातील वाढ केवळ महागाई नियंत्रित करण्याच्या तातडीच्या गरजेमुळेच नव्हे, तर जागतिक पातळीवरील प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केलेली आक्रमक व्याजदर वाढ आणि त्याच्याशी सुसंगत राहण्याचा विचार करून घेण्यात आला आहे, असे दास यांनी सांगितले. 

जगाने दोन मोठय़ा संकटांचा सामना केला. करोनाची महासाथ आणि यंदा रशिया-युक्रेन संघर्षांतून उद्भवलेली तीव्र महागाई.  या असाधारण परिस्थितीचा सामना प्रगत आणि विकसनशील अशा दोन्ही अर्थव्यवस्थांना करावा लागत आहे. सध्या प्रगत देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीच्या आक्रमक धोरणामुळे उद्भवलेल्या तिसऱ्या मोठय़ा संकटाच्या आपण केंद्रस्थानी आहोत. मात्र जगभरातील स्थितीपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहिली आहे.

– शक्तिकांत दास, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर

हप्ता किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समजा बँकेकडून २० वर्षांच्या कालावधीसाठी ८ टक्के दराने ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल आणि त्यावर सध्याचा मासिक हप्ता २५,०९३ रुपयांचा असेल तर त्यात आता अर्ध्या टक्क्यांची वाढ जमेस धरल्यास कर्जाचा नवा व्याजदर ८.५० टक्के होऊन, त्याच कर्जदाराला २६,०३५ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच मासिक हप्तय़ात ९४२ रुपयांची वाढ होईल.