नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सर्व दूरसंचार कंपन्यांना एक महिन्याची म्हणजेच ३० दिवसांची वैधता असलेला किमान एक ‘प्लॅन’ उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सर्व दूरसंचार कंपन्यांच्या एक महिन्यांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये केवळ २८ दिवसच उपलब्ध असतात.
सोमवारी दिलेल्या सूचनेनुसार, किमान एक तरी प्लॅन २८ दिवसांऐवजी ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचे निर्देश ‘ट्राय’ने दिले आहेत. यापूर्वीही दूरसंचार कंपन्यांना वैधता वाढविण्याबाबत नियामकांनी सूचना दिल्या आहेत. मात्र दूरसंचार कंपन्यांकडून त्याचे पालन करण्यात आले नाही.
नव्या आदेशाचे पालन करण्यासाठी ६० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. सध्या ग्राहकांना दर महिन्याकाठी करण्यात येणाऱ्या रिचार्जच्या माध्यमातून २८ दिवस सेवा मिळते. यामुळे वर्षभरासाठी त्यांना १३ रिचार्ज करावे लागतात, अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहकांकडून आल्या आहेत. मात्र पूर्ण ३० दिवस सेवा मिळाल्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होईल. ‘ट्राय’च्या या निर्णयामुळे ग्राहकांना एका महिन्याच्या अतिरिक्त रिचार्जच्या शुल्काची बचत होईल.