विजय मल्या यांच्या उद्योगसाम्राज्यातील ध्वजधारी कंपनी यूबी (युनायडेट ब्रेव्हरिज) होल्डिंग्जलाही सार्वजनिक क्षेत्रातील युनायटेड बँक ऑफ इंडियाने निर्ढावलेले कर्जदार (विलफुल डिफॉल्टर) जाहीर केले आहे. बँकेने यापूर्वी समूहाचे प्रमुख विजय मल्या यांच्यासह किंगफिशर एअरलाइन्स कंपनी आणि तिचे चार संचालक यांच्यावरही हा ठपका ठेवला आहे.
किंगफिशरसाठी घेतलेल्या कर्जासाठी यूबी होल्डिंग्ज ही हमीदार कंपनी राहिली आहे; मात्र देणीक्षमता असूनही कंपनीने अद्याप कर्जफेड न केल्याने आम्ही तिला निर्ढावलेली कर्जदार म्हणून जाहीर करीत असल्याचे बँकेचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी स्पष्ट केले. यूबी होल्डिंग्जच्या २०१३-१४ ताळेबंदात अतिरिक्त रक्कम असल्याचे दिसत असूनही त्याचा उपयोग कर्जदेणीसाठी केला जात नसल्याचेही नारंग यांनी नमूद केले. बँकेने याबाबत कंपनीला यापूर्वीच नोटीस बजावली होती. मात्र त्याबाबत समाधान न झाल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे नारंग यांनी म्हटले आहे.
सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वप्रथम युनायटेड बँक ऑफ इंडियाने किंगफिशर एअरलाइन्स व तिचे प्रवर्तक मल्या यांना कर्जबुडवे म्हणून जाहीर केले होते. त्यासाठीची नोटीस सर्वप्रथम २८ मे रोजी पाठविण्यात आली होती. किंगफिशरमार्फत ३५० कोटी रुपयांचे कर्ज बँकेला येणे आहे. विविध १७ बँकांनीही ऑक्टोबर २०१२ पासून उड्डाणे बंद असणाऱ्या किंगफिशरला ६,५२१ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मल्या यांना किंगफिशरचे पुन्हा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद भूषविण्यास कंपनी व्यवहार खात्याने सोमवारीच परवानगी नाकारली. त्याचबरोबर मालकी हिस्सा कमी झाल्याने मल्या मंगलोर केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या संचालकपदावरूनही पायउतार झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2014 रोजी प्रकाशित
मल्यांची ‘यूबी होल्डिंग्ज’ही कर्जबुडवी!
विजय मल्या यांच्या उद्योगसाम्राज्यातील ध्वजधारी कंपनी यूबी (युनायडेट ब्रेव्हरिज) होल्डिंग्जलाही सार्वजनिक क्षेत्रातील युनायटेड बँक ऑफ इंडियाने निर्ढावलेले कर्जदार (विलफुल डिफॉल्टर) जाहीर केले आहे.

First published on: 03-12-2014 at 12:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: United bank of india identifies ub holding as wilful defaulter