सामान्य विमा क्षेत्रातील सरकारी कंपनी युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी ११,००० कोटी रुपये विमा हप्ते (प्रीमियम) उत्पन्नापोटी मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांच्या तुलनेत ते १३००कोटींनी अधिक असेल. कंपनीने सरलेल्या वर्षांत ९,७०९ कोटी रुपयांचे हप्ते उत्पन्न कमावले. जे त्या आधीच्या २०१२-१३ सालात ९,२६६ कोटी रुपये होते.
युनायटेड इंडियाने २०१३-१४ सालात ५२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, जो प्रामुख्याने दाव्यांचे प्रमाण (क्लेम रेशो) २०१२-१३ मधील ८४.६१ टक्क्य़ांवरून ८२.५६ टक्क्य़ांवर घसरणीतून शक्य झाला आहे. कंपनीने गुंतवणुकांतून कमावलेल्या उत्पन्नाचे प्रमाण १,८५७ कोटी रुपयांचे आहे. कंपनीच्या गुंतवणूक भागभांडाराचे मूल्य ३१ मार्च २०१४ अखेर २१,५४५ कोटी रुपयांवर गेले आहे, जे आधीच्या वर्षांत १९,९५० कोटी रुपये होते.

उत्तराखंड पूरग्रस्तांचे ८३४ कोटींचे दावे मंजूर
सर्वच सामान्य विमा कंपन्यांच्या दृष्टीने जोखमेची ठरलेली उत्तराखंडमधील गेल्या वर्षीच्या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीतून युनायटेड इंडियाचा संभाव्य तोटाही १,५०० कोटी रुपयांच्या घरात जाणारा असेल, असे अंदाजण्यात येत आहे. कंपनीकडे आजवर १५७ भरपाईसंबंधी दावे दाखल झाले असून, त्यापैकी १३५ दाव्यांचे निवारण करून ८३४ कोटी रुपयांची पूर्ण भरपाई संबंधित पॉलिसीधारकांना अदा केली आहे.